भोकर : देशात हुकुमशाही विरुद्ध लाट आहे. घटना बदलण्याची लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. महत्वाचे म्हणजे, मोदी सरकारविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिवसेनेचा सातबारा बदलून तो गद्दाराच्या नावे केला, त्याचप्रमाणे उद्या आमचाही सातबारा बदलणार की काय? अशी भिती शेतकऱ्यांना वाटत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. तसेच देशातील हुकूमशाहीचे संकट दूर करण्यासाठी नांदेडात झालेला 'चिखल' धुवून टाका, असे आवाहनही ठाकरे यांनी मतदारांना केले. त्यांनी आज सकाळी पत्रकारांसोबत संवाद साधला.
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे काही तास शिल्लक आहेत. भोकर येथील तलाव रिसोर्टवर आज सकाळी ११ वाजता माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन टोकाचे तीन पक्ष एकत्र येवून, सन २०१९ मध्ये महाआघाडीचे सरकार माझ्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. एक चांगले सरकार चालत होते. परंतु गद्दारी झाली नसती तर महाराष्ट्र पुढे गेला असता. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, पण दुसरीकडे सामान्य जनतेची सुरक्षा सोडून राज्य सरकार गद्दाराच्या सुरक्षेवर खर्च होत असल्याचा घणाघात केला.
अशोकराव चव्हाण गेले तरी नवीन चेहरे काॅंग्रेस मध्ये येत असल्याने, काॅंग्रेसला नवचैतन्य प्राप्त होत आहे. नेते गद्दार झाले तरी मतदार गद्दार होत नाहीत असा विश्वास व्यक्त केला. तसेच हुकुमशाहीचं संकट दूर करण्यासाठी नांदेडमध्ये झालेला चिखल धुवून टाका असा टोला महायुतीचे उमेदवार खा. चिखलीकर यांचे नाव न घेता लगावत ठाकरे यांनी महाआघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांना विजयी करा असे आवाहन केले.
यावेळी महाआघाडीचे उमेदवार वसंत बळवंतराव चव्हाण, कमलकिशोर कदम, काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष हनमंत पाटील बेटमोगरेकर, बी. आर. कदम, गोविंदबाबा गौड, बाळासाहेब रावणगावकर, प्रकाश भोसीकर, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) डॉ. सुनील कदम, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख संतोष आलेवाड, शिवसेना पदाधिकारी यांची उपस्थिती होती.