नांदेड: येथील बांधकाम व्यवसायिक संजय वियानी यांचा खून करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी त्यांच्या एकूणच दिनचर्येवर अनेक दिवस वॉच ठेवला असावा, त्यांच्याबाबत मारेकऱ्यांना कोणी तरी टिप दिली असावी, असा संशय विशेष तपास पथकातील पोलीस अधिकाऱ्यांना आहे.
५ एप्रिल राेजी संजय बियाणी यांची त्यांच्या येथील राहत्या घरासमाेर भरदिवसा दाेन अज्ञात मारेकऱ्यांनी गाेळ्या झाडून निर्घृण हत्या केली हाेती. या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. मात्र, गेल्या महिनाभरात बियाणींचे मारेकरी शाेधण्यात एसआयटीला यश आलेले नाही. वेगवेगळ्या दिशेने पाेलिसांचा तपास सुरू आहे.
पाेलीस सूत्रांनी सांगितले की, संजय बियाणी यांची दिनचर्या ठरलेली हाेती. दरराेज सकाळी पाच वाजता ते आपल्या वेगवेगळ्या बांधकामांच्या साईट्सवर जाऊन भेट देत हाेते. त्यानंतर ११ वाजता घरी येत हाेते. दुपारी ३ पर्यंत घरी राहून पुन्हा बाहेर निघत हाेते. त्यांचा हा दिनक्रम मारेकऱ्यांनी पूर्णत: माहित करून घेतला असावा शिवाय याबाबत मारेकऱ्यांना कुणीतरी टिपही दिली असावी, असा संशय आहे. घटनेच्या दिवशी संजय बियाणी येथील एक राजकीय नेता तथा आपल्या व्यावसायिक भागीदाराकडे गेले हाेते. त्यादिवशी ते सकाळी त्या भागीदाराला घेऊन महानगरपालिकेत जाणार हाेते व सायंकाळी ते मुंबईला जाणार हाेते, अशी माहिती आहे. त्या भागीदाराकडे ते बसलेले असतानाच त्यांना घरून जेवणासाठी फाेन येत हाेते. घरी मुलगी व जावई आलेले असल्याने साेबत जेवणासाठी ताट वाढलेले आहे, म्हणून सतत फाेन आल्याने, ते घरी गेले. मात्र, त्यांना जेवणाची संधी मिळाली नाहीच. घरात पाेहोचण्यापूर्वीच मारेकऱ्यांनी त्यांचा खून केला. बियाणी यांना शिवाजीनगर स्थित जनता मार्केटच्या जागेवर बांधकामाचे १५० काेटींचे, तसेच शहराच्या मध्यवस्तीतील साडेचार एकर जागेच्या विकासाचे कंत्राट मिळाले हाेते, अशी माहिती आहे.
त्या घराकडे मारेकऱ्यांचा वावर नाहीबियाणी त्या भागीदाराकडे सकाळी गेले हाेते. मात्र तेथील काेणत्याही कॅमेऱ्यात मारेकऱ्यांनी तेथून पाठलाग केल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे बियाणी घरी पाेहोचत आहेत याबाबतची टिप मारेकऱ्यांना बाहेरूनच कुणी तरी दिली असावी, असा संशय असून, पाेलीस त्या टिप देणाऱ्याच्या शाेधात आहेत. पाेलिसांनी सध्या संपूर्ण फाेकस बियाणी प्रकरणावर केला आहे. त्याअनुषंगाने पाेलीस पथके परप्रांतातही गेली हाेती.
चालकाची आठ दिवस सलग चाैकशीघटनेच्या वेळी स्टेअरिंगच्या खाली लपून बसलेल्या चालकाची पाेलिसांनी तब्बल आठ दिवस ताब्यात ठेवून चाैकशी केली. मात्र त्याचा या खुनाशी काहीही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. सर्व काही अचानक झाल्याने व काहीच न सुचल्याने केवळ जिवाच्या भीतीने हा चालक स्टेअरिंगखाली लपून बसला हाेता, अशा निष्कर्षापर्यंत पाेलीस आले आहेत.
डीआयजींची आक्रमक भूमिकासंजय बियाणींच्या खून प्रकरणाच्या तपासावर नांदेड परिक्षेत्राचे पाेलीस उपमहानिरीक्षक निसार तांबाेळी स्वत: लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणात कुणाचाही मुलाहिजा नाही. कुणी कितीही माेठा असाे, तपासात आवश्यक असेल तर त्याला बाेलवा. येत नसेल तर थेट पाेलीस जीपमध्ये टाकून आणा, असे स्पष्ट निर्देश डीआयजी तांबाेळी यांनी एसआयटीच्या पाेलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याचेही सांगण्यात आले.