धर्माबाद ( नांदेड) : सर्वोच न्यायालयाच्या निकालाप्रमाणे धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे रविवारी उघडण्यात आले. त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत बंधाऱ्यातील १५़८१ दशलक्ष घनमीटर (०़५६ टीएमसी) जलसाठा तेलंगणात सोडण्यात आला. त्यामुळे ऐन पावसाळ्यात हा बंधारा कोरडाठाक झाला.
बाभळी बंधाऱ्याचे लोकार्पण होऊन पाच वर्षे पूर्ण होत आहेत. १ जुलै रोजी दरवाजे उघडावे व उपलब्ध पाणीसाठा तेलंगणात सोडण्यात यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी २०१३ रोजी दिला. त्याप्रमाणे दरवर्षी ही कार्यवाही होत आहे. रविवारी सकाळी १० वाजता बंधाऱ्याचा पहिला दरवाजा उघडण्यात आला़ त्यानंतर काही वेळातच चौदाही दरवाजे उघडण्यात आले. बंधाऱ्यातील पूर्ण पाणीसाठा तेलंगणात गेला.
यावेळी केंद्रीय जलआयोगाचे कार्यकारी अभियंता ई.व्यंकटेश्वरलू, तेलगंणा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता बी.रामाराव, आंध्र प्रदेशचे कार्यकारी अभियंता मोहनराव, नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मुकुंद कहाळेकर, बाभळी बंधारा उपकार्यकारी अभियंता प्रशांत पाटील करखेलीकर, उपअभियंता एस.आर.संतान, शाखा अभियंता एस.बी.पटके, शेलार, देवकांबळे, गंगाधर पाटील बाभळीकर या त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत हे चौदा दरवाजे उघडण्यात आले. यावेळी बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोषणगावकर, सहसचिव जी.पी. मिसाळे, छावाचे मराठवाडा अध्यक्ष सतीश पाटील शिंदे, कुणाल पवारे आदी उपस्थित होते.
काठोकाठ भरलेला बंधारा कोरडाठाक झालाबंधारा पाण्याने काठोकाठ भरला होता. ते जमा झालेले पूर्ण पाणी तेलगंणात गेले. यंदा पाऊस न झाल्यास बंधारा कोरडाच राहणार आहे़ शासनाने याबाबतीत पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी. तत्पूर्वी उपलब्ध जलसाठ्याचा उपयोग करण्यासाठी बंद पडलेल्या जलसिंचन योजना चालू कराव्यात अथवा नवीन जलसिंचन योजना राबविण्यात यावी़ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बाभळी बंधारा कृती समितीने केली आहे.