माळाकोळी : लोहा तालुक्यातील उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी धरणधरणाचे पाणी स्थानिकांना सोडून उदगीर व पालम तालुक्याला देण्याचा निर्णय शासनदरबारी झाल्यामुळे चालू असलेल्या पाणीपुरवठा योजना स्थानिक नागरिकांकडून वारंवार बंद पाडण्यात येत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी माळेगाव यात्रा येथील विश्रामगृहावर ७ जुलै रोजी उदगीर परभणी व नांदेड येथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेण्यात आली.या विषयाला अनुसरून पुढील बैठक ही औरंगाबाद विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिली आहे. ऊर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी धरण नांदेड - लातूरच्या सीमेवर असून या धरणातील पाणी क्षमता १०७़६० दलघमी आहे. याप्रसंगी उदगीरचे आ.सुधाकर भालेराव म्हणाले, लिंबोटी धरणाचे ३२ टक्के मृतसाठामधील पाणी उदगीरला पिण्यासाठी देण्याची विनंती नागरिकांना केली. शेती सिंचनासाठी लिंबोटी धरणाचे पाणी मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रशासकीय मदत आपण करु. पिण्याच्या पाण्यासाठी कोणीही अडचण निर्माण करू नये अशी विनंती त्यांनी याप्रसंगी केली.लिंबोटी धरण परिसरातील अनेक गावे पाण्याशिवाय तहानलेले असताना व लोहा तालुक्यातील शेती सिंचनाला पाणी दिल्याशिवाय इतरत्र पाणी जाऊ देणार नसल्याची भूमिका माळाकोळीचे जि.प.सदस्य चंद्रसेन पाटील व स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.बैठकीला उदगीरचे नगराध्यक्ष बसवराज वागदरे, पालमचे नगराध्यक्ष रोकडे, माळेगावचे सरपंच गोविंदराव राठोड, पंडित धुळगुंडे, लातूर निवासी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, शिवणे, उदगीर मुख्याधिकारी विद्या गायकवाड, पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता कटके, कमोड, नागरगोजे परभणी येथील मुख्य कार्यकारी अभियंता जगतारे, अधीक्षक अभियंता कायंदे, कार्यकारी अभियंता कावळे, मुंडे, महाजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी बोरगावकर आदी उपस्थित होते.
लोह्यात लिंबोटी धरणाचे पाणी पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:36 AM