धर्माबाद (जि. नांदेड) : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बाभळी बंधाऱ्याचे चार दरवाजे १ मार्च रोजी त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत सकाळी ११ अकरा वाजता उघडले व तेलंगणातपाणी सोडल्यानंतर दुपारी १ वाजता दरवाजे बंद करण्यात आले. ०.६ टीएमसी पाणीतेलंगणात सोडण्यात आल्याने आता बंधाऱ्यात ०.७१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
धर्माबाद तालुक्यातील बाभळी (ध.) गावातील गोदावरी नदीकाठावर २५० कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनाने बाभळी बंधारा बांधला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा २९ आॅक्टोबर २०१४ रोजी पार पडला. त्यावर्षी पावसाळा संपल्यानंतर जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिला. या बंधाऱ्याच्या बांधकामावरून महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात वाद झाला.
यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने २८ फेब्रुवारी २०१३ रोजी याबाबत निर्णय दिला असून बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे दरवर्षी २९ आॅक्टोबरनंतर खाली सोडावेत व नंतर १ जुलै रोजी वर उचलावेत. पूर्वीचे आंध्रप्रदेश व आताच्या तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरच्या बॅकवॉटर साठ्यात १ मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी सोडावे, असा निकाल दिला. त्यानुसार १ मार्च रोजी नांदेड पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या चार दरवाजांतून उपलब्ध १.३१ टीएमसी साठ्यातून ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडले.
पाणीपातळी ३३३ मीटरवरपाणी सोडण्यापूर्वी पाणीपातळी ३३५ मीटर होती. पाणी सोडल्यानंतर पाणीपातळी ३३३ मीटरवर आली असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. यावेळी केंद्रीय जलआयोगाचे कार्यकारी अभियंता व्ही. गंगाधर, तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरचे कार्यकारी अभियंता बी. रामाराव, महाराष्ट्र पाटबंधारे विभाग नांदेडचे कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे, बाभळी बंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता पडवळकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर.के. मुक्कावार, कनिष्ठ अभियंता सचिन देवकांबळे, तसेच बाभळी बंधारा कृती समितीचे सहसचिव जी.पी. मिसाळे आदी उपस्थित होते.