नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्याची पाहणी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शुक्रवारी सकाळी केली. यावेळी त्यांनी १० जूनपर्यत पाणीसाठा पुरेल यासाठी उपाययोजना करुन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.शहराची पाणी परिस्थिती गंभीर बनली असून विष्णूपुरी प्रकल्पात अवघा २ दलघमी साठा शिल्लक राहिला आहे. शहरात सध्या १५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, विविध भागांत पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी काळेश्वर परिसरात पाणीसाठ्याची पाहणी केली.विष्णूपुरी प्रकल्पातील पाणी १० जूनपर्यंत पुरेल एवढे आहे. यासाठी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने पाणी वाया जावून नये म्हणून आतापर्यत शहरातील २४० नळांना तोट्या बसविल्या आहेत. दरम्यान, शहराला आसना नदीवरील बंधाºयातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. इसापूर उर्ध्व पैनगंगेच्या दोन पाळ्या आणखी मिळणार आहेत. पैकी १२ जून रोजी पाणीपाळी मिळणार असून त्यानंतर १५ दिवसांनी दुसरी पाणीपाळी मिळणार आहे. या पाण्यावर ३० जुलैपर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. यावेळी कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते़
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडून विष्णूपुरीतील जलसाठ्याची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:42 AM