उमरी: चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेला उमरी शहराचा वीजपुरवठा सलग तिस-या दिवशीही चालू झाला नाही. त्यामुळे ६ जून रोजी शहरात पाच टँकरने पाणी पुरवठ्याची सोय नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आली होती.मंगळवारी संध्याकाळी झालेल्या चक्रीवादळाने सर्वत्र दाणादाण उडाली होती. शहरात अनेक ठिकाणी विजेचे खांब भुईसपाट झाले. रानोमाळ तारा तुटून पडल्या. हे सर्व खांब उभे करुन वीजपुरवठा सुरळीत करणे हे महावितरण समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे अजून दोन-तीन दिवस तरी शहराचा वीजपुरवठा नियमित होणे शक्य नाही. वीज पुरवठा नसल्याने याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद पडला त्यामुळे गुरुवारी सकाळपासून नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. विंधन विहिरीतून जनरेटरद्वारे पाण्याचा उपसा करून टँकर भरले जात आहेत. या पाच टँकरद्वारे शहरातील विविध गल्लीबोळातून पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था गुरुवारी सकाळपासून चालू झाली.पाण्यासाठी लोकांनी मोठमोठ्या रांगा लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. गेल्या वीस वर्षात पहिल्यांदाच उमरी शहरात अशा प्रकारे पाणीपुरवठा करणारे टँकर फिरत असल्याचे दिसून येत आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे हे सर्व पाणीपुरवठ्याच्या या यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत.शहराची व्याप्ती लक्षात घेता ही यंत्रणा अत्यंत तोकडी पडत आहे. मात्र आहे. त्या परिस्थितीत लोकांना टँकरचे पाणी घेतल्याशिवाय कसलाच पर्याय नाही. विजेची सर्व उपकरणे बंद पडल्याने थंड पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. भोकर शहरातून उमरीत थंड पाण्याचे कॅन विक्रीसाठी दाखल झाले. पन्नास रुपयाला एक याप्रमाणे या कॅनची हातोहात विक्री झाली. गुरुवारी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत उमरी शहरातील काही भागात विद्युत पुरवठा चालू होईल, अशी माहिती महावितरणचे अभियंता सुनील कासनाळे यांनी दिली. ग्रामीण भागातील जवळपास पन्नास ते साठ खेड्यामध्ये मात्र विजेची समस्या गंभीर बनली आहे.तारा तुटून पडल्यामंगळवारी संध्याकाळी झालेल्या चक्रीवादळाने सर्वत्र दाणादाण उडाली होती. शहरात अनेक ठिकाणी विजेचे खांब भुईसपाट झाले. रानोमाळ तारा तुटून पडल्या. हे सर्व खांब उभे करुन वीजपुरवठा सुरळीत करणे हे महावितरण समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. वीजपुरवठा नियमित होणे गरजेचे आहे़
उमरी शहरासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे मात्र चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटात विजेअभावी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. चक्रीवादळाने उमरी शहरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच विजेअभावी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. मात्र आम्ही नागरिकांच्या पाठीशी आहोत-अनुराधा सदानंद खांडरे, नगराध्यक्ष उमरी
शहराला पाणीपुरवठा होणा-या गोरठा येथील न.पा.च्या विहिरीवर जनरेटरद्वारे पाण्याचा उपसा करून गुरुवारी सायंकाळपर्यंत शहराला पाणीपुरवठ्याची सोय होईल. विद्युत पुरवठा सुरळीत होताच सर्वत्र पाणी पुरवठा चालू होईल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.- काकासाहेब डोईफोडे, मुख्याधिकारी , नगरपरिषद उमरी.