हदगाव : जानेवारी, मार्च, एप्रिल व जून या कालावधीमध्ये १५० नवीन सिंचन विहिरी खोदल्या. परंतु, अद्यापही त्याची कामे पूर्ण झाली नाहीत. यामुळे ग्रामस्थांना ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही वीस गावांची तहान टँकरवरच भागविणार की काय? असे चित्र आहे.तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा (९५० मिमी) ६५० मिमी पाऊस झाला. सुरुवातीला धो-धो पाऊस झाल्याने तो जमिनीत मुरण्याऐवजी वाहून गेला. तालुक्यात दोन नद्या व २८ तलाव असूनही पाण्याची समस्या काही भागात गंभीरच आहे. मनाठा, तामसा, तळणी, निवघा या सर्कलमधील २० गावांंना टँकरने पाणीपुरवठा सुरु होता. यावर्षी तेच चित्र आहे. पळसा व मनाठा या दोन गावांसाठी मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली. कामेही सुरु केले. परंतु या उन्हाळ्यात त्या योजनेचे पाणी मिळण्याची सूतराम शक्यता नाही.जलयुक्त शिवार अभियानात ५०-७० गावांमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा प्रयोग झाला. परंतु पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे. दोन्ही नद्यांचे पाणी कुठेही न थांबता वाहून जात असल्याने नदीकाठावरील गावांतही पाणीटंचाई आहे.प्रत्येक कुटुंबात खाजगी बोअर झाल्यामुळे पाणीपातळी खोल गेली आहे. दोनशे फूट खोलीपर्यंत बोअर घेण्याचा शासनाचा नियम असला तरी शेतात व घरी पाचशे ते सातशे फुटांपर्यंत बोअर घेतले जातात. शंभर मीटर अंतरापर्यत दुसरा बोअर घेता येत नाही. परंतु, घराघरांमध्ये बोअर झाल्यामुळे जमिनीची चाळणी होऊन पाणीपातळी खालावली आहे.दरवर्षी पाणीटंचाईच्या बैठका होतात.शाश्वत पाणी आणण्याचे आश्वासन हवेतच विरले की काय ? असा प्रश्न पडला आहे. तीन-चार वर्षांपासून हालचाली बंद आहेत. सध्या बरडशेवाळा गावात पाण्याची तीव्रटंचाई सुरु आहे. एक किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. कुठे नियोजन नसल्यामुळे पाणीटंचाई आहे तर कुठे पाणीपुरवठा योजनेची कामे रखडल्यामुळे पाणीटंचाई आहे. १२ डिसेंबरला पाणीटंचाई निवारणार्थ आराखड्यावर बैठक आहे. या बैठकीमध्ये मागील कामाचा आढावा घेतला तर परिस्थिती लक्षात येईल.
- येत्या एक-दोन महिन्यांत तामसा, मनाठा, वडगाव, तळणी, पेवा, ठाकरवाडी, कनकेवाडी, सावरगाव, उमरी, कोंढूर, दिग्रस, निवघा, साप्ती आदी गावात पाणीटंचाई होऊ शकते. शाश्वत पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी तहानलेल्या गावांची मागणी आहे.
- जलयुक्त शिवार अभियानात ५०-७० गावांमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा प्रयोग झाला. परंतु पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे. दोन्ही नद्यांचे पाणी कुठेही न थांबता वाहून जात असल्याने नदीकाठावरील गावांतही पाणीटंचाई आहे.
- प्रत्येक कुटुंबात खाजगी बोअर झाल्यामुळे पाणीपातळी खोल गेली आहे. दोनशे फूट खोलीपर्यंत बोअर घेण्याचा नियम असला तरी सातशे फुटांपर्यंत बोअर घेतले जातात.