श्रीक्षेत्र माहूर : माहूर शहरासह तालुक्यातील ४० गावांची जलवाहिनी म्हणून पैनगंगा नदीच्या पाण्याचे नागरिक जलपूजन करीत असतात़ त्याच पैनगंगा नदीचे पात्र नोव्हेंबर महिन्यातच कोरडेठाक पडल्याने शहरासह खेडेगावात भीषण जलसंकट उभे टाकले आहे़ नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पैनगंगा नदी पात्रावरील बंधा-यात साठवलेले पाणी पात्रात सोडण्याची मागणी होत आहे़श्हरासाठी नळयोजना बनविण्यात आली़ परंतु पाणीच नसल्याने ती वांझोटी ठरत आहे़ माहूर शहरासह अनेक गावांची नळयोजना पैनगंगा नदी पात्रावरून बनविण्यात आल्या़ दुष्काळी परिस्थितीत बंधा-यातील पाणी नदीपात्रात सोडले जाईल या आश्ेवरच आहेत़ परंतु तीन बंधा-यापैकी एकाही बंधा-याचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत नसल्याने हे बंधारे काय कामाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे़ कामधंदे सोडून प्रशासनास जागे करण्यासाठी वारंवार आंदोलनचे करायचे काय किंवा राजकीय हेव्यादाव्यापोटी पदाधिका-यांना बदनाम करण्यासाठी मोर्चे तक्रारी करून वेळ मारून न्यायची, अशी चर्चा तालुकाभर होत आहे़ या भानगडीत मात्र तालुक्यातील नागरिकांना विनाकारण वेळ व पैसा खर्ची घालावा लागत असून चिमटा धरणाच्या भागनडीत मदनापूर व उनकेश्वर येथील दोन बंधा-याचे काम रोखण्यात आल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे़नदीपात्रातील पाणी संपल्याने उद्भव विहिरीजवळ नदीपात्रात जेसीबीद्वारे मोठा खड्डा करण्यात आला व दोन बोअर पाडण्यात आले़ परंतु येथेही पाणी न लागल्याने नगर पंचायतच्या प्रयत्नांच्या पदरी निराशाच पडली़ नळयोजना परिपूर्ण असूनही पाणीच नसल्याने दररोज लागणारे ३० लक्ष लिटर पाणी अणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे़पर्यायी व्यवस्था म्हणून शहराला लागून असलेले भोजंता तलाव खांडाखोरी तलाव गुंडवळ तलाव या तलावातून पाणी घेण्याचे ठरविण्यात आले़ नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मुख्याधिकारी विद्या कदम, लेखापाल तथा कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी देवदेवेश्वर संस्थानचे महंत मधुकर बाबा शास्त्री कविश्वर यांना विनंती केल्याने भोजंता तलावातून माहूर शहरास ८ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून सर्व तलावात २ महिने पुरेल इतका पाणीसाठा असून पैनगंगा नदीपात्रात हिंगणी, दिघडी बंधा-याचे पाणी न सोडल्यास शहरासह तालुक्यात दुष्काळ धूमाकूळ घालेल यात शंका नाही़
- नदीपात्रात असलेल्या कोल्हापुरी बंधा-यात सात ते आठ फुट पाणी साचते़ दररोज ३० लाख लिटर पाणी या बंधा-यातून घेतल्यास महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा या बंधा-यात साचल्याने बंधा-याची २० फुट उंची वाढविणे किंवा हिंगणी-दिगडी बंधाºयावरून या बंधा-यापर्यंत पाईपलाईन टाकणे या दोन पर्यायाचे वरिष्ठांकडे दाखल करण्यात आलेले प्रस्ताव धूळखात पडलेले असून तालुक्यात व माहूर शहरात विरोधी पक्षांची सत्ता असल्याने एकही काम वेळेवर होत नसल्याने चढाओढीच्या राजकारणात अधिकारीही सत्ताधा-यांची बाजू घेत असल्याने तालुक्यातील शेकडो विकासकामे रेंगाळल्याने सामान्य माणूस पाण्यासह इतर सुविधांपासून वंचित राहत आहे़
- नगर पंचायत माहूरकडून ल़पा़ विभागाकडे नदीपात्रातील बंधा-यातील पाणी आरक्षण करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला़ परंतु नदीपात्रात खुले पाणी सोडता येणार नसल्याचे पत्र देवून शासनाकडे नागरिकांनी पाणी मागू नये असे पत्र देत मागणीचे दरवाजेच बंद करण्यात आले आहेत़