शेतातील साहित्य लंपास
लोहा- तालुक्यातील मौजे पार्डी शिवारात शेतातील साहित्य लांबविण्यात आले.७ ते ८ जानेवारी दरम्यान ही घटना घडली. शहरातील गवळी गल्लीतील शंकर कोनोडे यांचे शेत पार्डी शिवारात आहे. चोरट्यांनी शेतातील विहिरीतील विद्युत पंप, स्टार्टर, वायर असा एकूण २० हजारांचा ऐवज लांबविला. या घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.
पाकळे यांना निरोप
हदगाव- तामसा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अशोक पाकळे यांना सेवानिवृत्तीबद्दल शाळेच्या वतीने सपत्नीक निरोप देण्यात आला. यावेळी माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, गटशिक्षणाधिकारी के.व्ही. पोले, मुख्याध्यापक सुरेश गडपाळे होते. सूत्रसंचालन चंद्रकांत तगडपल्ले यांनी केेले. हदगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारीपदी के.व्ही. पोले यांची नियुक्ती झाल्याबद्दल विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कौडगे यांचा सत्कार
नायगाव- मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश कौडगे यांचा नायगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प.चे माजी सदस्य बाबुराव लंगडापुरे यांची उपस्थिती होती.
आगलावे यांचा सत्कार
अर्धापूर - जिल्हा असंघटित कामगार संघटना व माजी सैनिक कै. काशिनाथ जाधव प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी मालेगाव पोलीस चौकीचे जमादार किशोर पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रदीप नागापूरकर, गंगाधर गायकवाड, प्रा. सदाशिव भुयारे, प्रा. लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते.
सात हजारांची दारू जप्त
भोकर- भोकर ते हिमायतनगर रोडवरील एका बेकरीजवळ विना परवाना दारू विक्री करणाऱ्यास पोलिसांनी पकडून त्याच्याकडील ७ हजार रुपयांची दारू जप्त केली. भोकर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ग्रामपंचायत बिनविरोध
कंधार- तालुक्यातील भोजूचीवाडी येथील ग्रामपंचायत बिनविरोध झाली. सदस्य म्हणून सतीश देवकते, प्रा. केशव कागणे, राधाबाई देवकते, आशा गुट्टे, पारुबाई कागणे, सखुबाई गुट्टे, शिवकांता केंद्रे यांची सदस्य म्हणून निवड झाली. आरक्षण कोणत्याही प्रवर्गाला सुटो, देवकते कुटुंबातील व्यक्ती सरपंचपदाची जबाबदारी पार पाडेल, असा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला.