हदगाव (नांदेड ) : उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच शहराला तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. शहरातील काही प्रभागात नळाला पाच दिवसांआड पाणी येत असल्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत.
इसापूर धरणामध्ये केवळ १३ टक्के साठा आहे़ नदीकाठच्या विहिरी, बोअर जानेवारीमध्येच कोरड्या पडल्या़ हदगाव शहरातील पाणीपुरवठा करण्यासाठी कोथळा नदीवर विहीर व बोअरची व्यवस्था करण्यात आली़ तरीही पाणीटंचाई आटोक्यात येत नसल्याने नदीवर तात्पुरता बंधारा बांधण्यात आला़ शहरातील बहुतांश हातपंप बंद आहेत़
शहरातील एका मुस्लिम सामाजिक संस्थेने ३० ते ३५ बोअर घेवून दिले़ त्यात विद्युतपंपही टाकले़ मात्र वीजजोडणीचे कोटेशन कोणी भरावे? पुन्हा येणारे बिल कोणी भरावे? या कारणावरून नगरपालिका अडचणीत सापडली़ शहरात नळजोडणीची संख्या ७०० ते ८०० आहे़ एकाच नावावर तीन-तीन कुटुंब मोटर लावून पाणी घेत असल्याने खालच्या बाजूस असलेल्या गल्ली-मोहल्ल्यामध्ये पाणीच जात नाही़ २०१० मध्ये टाकलेली पाईपलाईनही ब्लॉक झाल्याने अंतिम भागात पाणीही जात नाही़
शहराला शुद्ध पाणी देण्याचा प्रकल्प पाच वर्षांपासून रखडला आहे़ तो पुन्हा प्रस्तावित केला असून मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात असल्याचे बालाजी राठोड यांनी सांगितले़ पाण्याचीच व्यवस्था नाहीतर शुद्ध पाणीपुरवठा कसा करणार? असा सवाल बांधकाम सभापती विद्याताई भोसकर यांनी केला़ नगरपालिकेत १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्नही चर्चिला गेला नाही़ त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत़ पाण्यासाठी नगरसेवकांना धारेवर धरले आहे.