नांदेड: शहरात अवैध नळजोडणींची संख्या वाढत असल्याने कमी दाबाने अल्प वेळेत पाणीपुरवठा होत आहे. दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांना महिन्यात केवळ दहा दिवसच पाणी मिळते. असे असले तरी नागरिकांना मात्र महिनाभराची पाणीपट्टी भरावी लागते. अवैध नळजोडणींकडे दुर्लक्ष करणार्या मनपाने अधिकृत नळधारकांना मात्र कर भरण्यासाठी कोंडीत पकडले आहे. शहरात सन २0११ मध्ये ३७ हजार नळजोडणी होत्या. २0१२ मध्ये ४५ हजार ५0२ नळजोडणींची संख्या होती. तर मागील वर्षभरात दहा हजारांहून अधिक नळजोडणी वाढल्या. अभय योजनेमुळे दोन वषार्ंपूर्वी अनेक नागरिकांनी नळजोडणींचा लाभ घेतला. दरम्यान, ही योजना बंद करण्यात आली. शहरातील काही भागात अवैध नळजोडणींची संख्या वाढत आहे. तरोडा खु. व बु. भागात अवैध नळजोडणी वाढल्यामुळे येथील नागरिकांना अल्प वेळ पाणी मिळत आहे.मनपाकडून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठय़ाचे नियोजन तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी मनपाने हा निर्णय घेतला आहे. परंतु अवैध नळजोडणी रोखण्यास मनपाकडे वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. अधिकृत नळजोडणी घेण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया टाळून एका रात्री रस्त्यावरील मुख्य पाईपलाईनला जोडणी देवून अनेकांनी नळ घेतले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. (/प्रतिनिधी)
■ नवीन करानुसार घरगुती नळधारकांना १ हजार ६५0 रूपये प्रतिवर्ष द्यावे लागणार आहेत. यापूर्वी १ हजार ५00 रूपये कर होता. दारिद्रय़ रेषेखाली लाभार्थ्यांसाठी पूर्वी ७५0 तर आता ८२५ रूपये द्यावे लागत आहेत. व्यावसायिक नळधारकांना यापूर्वी ६ हजार ६00 तर आता ८ हजार ४00 रूपये वार्षिक पाणीपट्टी भरावी लागत आहे. धार्मिक स्थळांना प्रतिमहिना ३0 रूपये भरावे लागत आहेत. मालमत्ता कर वाढीनंतर आता पाणीपट्टी करातही वाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. महिन्याभरातील केवळ दहा दिवसच पाणी मिळत असले तरी पाणीपट्टी मात्र महिनाभराची भरावी लागत आहे.