'सर्पाला पाय अन् वाघाला गळा देऊन चाललंय'; अतिवृष्टीग्रस्तांना अजित पवारांसमोर अश्रू अनावर
By शिवराज बिचेवार | Published: July 30, 2022 11:41 AM2022-07-30T11:41:55+5:302022-07-30T11:43:44+5:30
''आता दुबार पेरणीसाठी घरात विकायलाही काही नाही. आम्ही आत्महत्या नाही करावी तर काय करावे''
नांदेड: ''पावसाने सर्वच हातच गेलं, सरकारी सायेब बोलायला तयार नाही, सर्पाला पाय आणि वाघाला गळा देऊन आमचं चाललंय, आता तुमीच काय तो न्यावं करावा'', अशा शब्दात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासमोर व्यथा मांडली.
शनिवारी सकाळी अजित पवार यांनी माहूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकरी महिलेने डोळ्यात अश्रू आणत समस्यांचा पाढा वाचला. पावसाने घर पडले, ताडपत्री बांधून छत केले, शेतात पाणीच पाणी आहे, आता पेरणीसाठी घरात विकायला ही काही नाही. आम्ही आत्महत्या नाही करावी तर काय करावे, असा सवालही त्यांनी केला. त्यावर पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ मदत देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर पवार हे हदगाव, अर्धापूर आणि नांदेड तालुक्यात पाहणी करणार आहेत.
आता 302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचा
अतिवृष्टीमुळे माहूर तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली. मयताची पत्नी, छोटा मुलगा मला भेटला, आता तुम्हीच सांगा मुख्यमंत्री महोदय 302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचा असा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पाहणी दौऱ्यात केला.