नांदेड - संपलेल्या विषयावर मी बोलत नाही अशी बोचरी टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काका राज ठाकरे यांच्यावर केली. नांदेडमधील पावडेवाडी येथे होणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन प्रसंगी आदित्य ठाकरे आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशात विरोध वाढतोय यावर प्रतिक्रिया देताना संपलेल्या विषयावर मी बोलत नाही. जेव्हा संघर्ष सुरू होता तेव्हा आम्ही जात होतो. आता संघर्ष संपलाय आता आशीर्वाद घ्यायला जाणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
वाडी भागातील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय भूमिपुजन सोहळ्यासाठी ठाकरे हे नांदेडात आले होते. पुढे ते म्हणाले, कोरोनामुळे दोन वर्ष अत्यंत वाईट गेले. परंतु त्या काळातही महाविकास आघाडीतील सर्वजण लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी फिरत होते. या काळात एक गोष्ट मात्र लक्षात आली. ती म्हणजे राज्यातील आरोग्य सेवा मजबूत करणे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातीलच आजचा एक टप्पा आहे. कामांना मंजूरी मिळते, परंतु वेग मिळत नाही, असा आजपर्यंतचा अनुभव होता. परंतु चांगले अधिकारी असल्यास कामांना वेग मिळून ती वेळेत पूर्ण होतात.
या भागासाठी उपजिल्हा रुग्णालय अत्यंत महत्वाचे होते. जेणेकरुन गोरगरीब नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळतील. त्यामुळे यापुढे ज्या लोकांनी हे रुग्णालय उभारण्यासाठी काम केले त्यांचा सत्कार करा. दर महिन्याला रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मी येणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, माजी मंत्री कमल किशोर कदम, खा.हेमंत पाटील, खा.बंडू जाधव, आ.बालाजी कल्याणकर, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटणकर, सीईओ वर्षा ठाकूर, आयुक्त सुनिल लहाने, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची उपस्थिती होती.