नांदेड : बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा कुख्यात हरविंदरसिंघ रिंदा याच्या चार साथीदारांना हरियाणा येथे अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हा साठा नांदेडात आणण्यात येणार होता. त्यामुळे नांदेड पोलीस अलर्ट झाले असून गुरुवारी रात्रीपासूनच नांदेड शहरात रिंदाच्या साथीदारांची झाडाझडती घेण्यात आली. बॉम्बशोधक पथक रिंदाच्या शेतावर गेले आहे.
रिंदाच्या साथीदारांच्या भागात कोम्बिंग ऑपरेशन करून तपासणी करण्यात आली. कुख्यात हरविंदरसिंघ रिंदा याच्यावर नांदेडात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच उद्योगपती, व्यापारी, डॉक्टर मंडळींकडून त्याने कोट्यवधींची खंडणी उकळल्याच्या तक्रारी आहेत. परंतु पोलिसांच्या हाती तो लागला नव्हता. सध्या तो पाकिस्तानात असल्याचे बोलले जात आहे. त्या ठिकाणाहून तो दहशतवादी कारवायांसाठी शस्त्र पुरवठा करीत आहे. हरियाणा पोलिसांनी रिंदाच्या चार साथीदारांना पकडून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला.
ही शस्त्रे नांदेडात येणार असल्याची हरियाणा पोलिसांची माहिती आहे. त्यानंतर नांदेड पोलिसांचे एक पथक शुक्रवारी हरियाणाच्या कर्नाल येथे पोहोचले आहे. पकडलेल्या आरोपींची नांदेडात कुणाशी लिंक होती, याचा शोध घेण्यात येत आहे, तर दुसरीकडे नांदेड शहरात पोलिसांनी कोम्बिग ऑपरेशन करून रिंदाच्या साथीदारांची झाडाझडती घेतली. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी एसआयटीतील अधिकारी, कर्मचारी, सर्व ठाण्यातील डीबी पथके, स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके रिंदाचे साथीदार आणि संशयितांची घरे पिंजून काढत आहेत. पोलिसांना काही घरांतून तलवारीही मिळाल्या आहेत. बॉम्बशोधक पथक रिंदाच्या शेतावर गेले आहे.
रिंदाचे ३३ साथीदार सध्या जामिनावरकुख्यात रिंदा टोळीतील ५० जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील १७ जण अद्यापही तुरुंगात आहेत, तर ३३ जण जामिनावर बाहेर आहेत. या ३३ जणांवर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचा वॉच होता. आता मात्र या सर्वांना दररोज सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालयात बसवून ठेवण्यात येत आहे. त्यांच्याकडून काही माहिती मिळते का? याची चाचपणी करण्यात येत आहे.
यापूर्वीही रिंदाने पाठविली शस्त्रे?रिंदा हा सध्या पाकिस्तानात असून त्या ठिकाणाहून ड्रोनद्वारे तो सीमेपार शस्त्रे पाठवितो. त्या ठिकाणाहून ती नांदेडला यापूर्वीही आणण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. नांदेडात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पिस्टल जप्त केल्या आहेत. त्यामुळे नांदेडला रिंदाकडून नियमित शस्त्र पुरवठा केला जातो काय? याचाही तपास सुरू आहे.