जुना मोंढा, वजिराबादेत होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर काही ठिकाणचे मार्ग बंद करून बाजारपेठ खुली करून देण्यात आली होती. वजिराबाद, जुना मोंढा आणि श्रीनगर भागात रस्त्याच्या दुतर्फात दुकाने थाटली होती. गणपती मूर्तीबरोबरच सजावटीचे साहित्य, पूजेला लागणारी हाराळ, आघाडा, केना, केळीचे खांब, कळंब, विविध प्रकारची फळे आदी साहित्य खरेदीसाठी भक्तांची चढाओढ लागली होती. कोरोना नियमांचे गर्दीत पालन करणे शक्य नाही. परंतु, बहुतांश भक्तांच्या तोंडावर मास्क पहायला मिळाले. त्याचबरोबर दरवर्षीपेक्षा यंदा खरेदीसाठी येणाऱ्यांमध्ये लहान मुलांचे प्रमाण घटल्याचे प्रकर्षाने जाणवत होते.
चाैकट...
खेळाच्या साहित्यांची चंगळ
सण-उत्सवातील खरेदीमध्ये घरातील बालगोपाळांचा आनंद काही वेगळाच असतो. त्यात गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी बहुतांश मंडळी लहान मुलांना सोबत घेऊन जातात. हीच बाब हेरून खेळाचे साहित्य विक्री करणाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात दुकाने थाटत लहान मुलांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. फुगे, काकडीपासून तयार केलेल्या विविध प्रकारच्या कलाकृती, फुग्याचे विमान, बासरी, भोंगे, डोक्याला बांधण्याच्या रंगीबेरंगी पट्ट्या, वाहनांच्या विविध प्रकारातील खेळणी, बाहुल्या आदी प्रकारचे खेळाचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले होते.
ना ढोलताशा.. मात्र गणपतीचा जयजयकार उत्साहात
गणरायाच्या आगमनावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या विविध नियम व निर्बंधाचे गणेशभक्तांनी पालन करून बाप्पाचे स्वागत केले. मंडळांपेक्षाही घरगुती प्रतिष्ठापनेसाठी गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्यांचा उत्साह काही वेगळाच दिसून आला. ना ढोलताशा ना अवास्तव गुलालाची उधळण... तरीही बाप्पाचे जल्लोषात अन् गणरायाचा जयजयकार करत भक्तांनी बाप्पाला घरी नेले. सायंकाळी उशिरापर्यंत विधिवत पूजाअर्चा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.