नांदेड: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आज मुंबईत सभा आहे. भाजप आणि मनसे हिदुत्वाच्या मुद्द्यावरून सातत्याने शिवसेनेची कोंडी करत आहेत. यामुळे आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अनेक नियम व अटी घातल्यानंतर औरंगाबादमध्ये १ मे रोजी राज ठाकरेंची सभा झाली होती. त्यानंतर होणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या सभेला गृह विभाग कोणते नियम लावले, असा सवाल उपस्थित झाला होता. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या सभेला जे नियम लावले गेले तेच नियम मुख्यमंत्र्यांच्या सभेला असतील असे स्पष्ट केले.
हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख राज ठाकरे यांनी 'मशिदी बाहेरील भोंगा हटावा, हनुमान चालीसा लावा' मोहीम जाहीर केली आहे. मुंबई आणि ठाणे येथे झालेल्या सभेनंतर औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांनी १ मे रोजी सभा घेतली. यावेळी सभेला परवानगी देताना पोलिसांनी अनेक अटी व नियम लावले होते. मात्र, सभेनंतर नियमांचे उल्लंघन झाल्याने राज ठाकरे आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आज होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला कोणते नियम लावण्यात आले आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आज नांदेड येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आले असता त्यांनी यावर उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांच्या सभेला अनेक नियम व अटी लावण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेलाही त्याच नियम व अटी आहेत का ? या प्रश्नावर गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या सभेलाही तेच नियम व अटी लागू राहणार आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे राज्याचा दौरा करणार, अनेक सभा घेणारमुख्यमंत्री ठाकरे राज्यभरात फिरतील. लोकांच्या समस्या जाणून घेतील. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसी संवाद साधतील. त्यासाठी विभागवार नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. आजच्या सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली. आमदारांच्या बैठकादेखील सुरू आहेत. जूनमध्ये शिवसेनेचा स्थापना दिन आहे. त्यावेळी औरंगाबादमध्ये महामेळाव्याचं आयोजन करण्यात येईल, असं राऊत यांनी सांगितलं.