नांदेड : कोरोना महामारीने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त केले तर अनेकांवर उपासमारीची वेळ आणली आहे. नांदेड शहरात असलेल्या वृद्धाश्रम आणि निराधार संगोपन केंद्रात पूर्वीप्रमाणे दान, धान्य अथवा इतर साहित्य येत नसल्याने त्यांच्यावर संकट ओढवले आहे. परंतु, संस्था चालकांकडून आहे त्या परिस्थितीत हा प्रपंच सुरू ठेवून निराधार, अनाथांसह वृद्ध नागरिकांना सन्मानजनक वागणूक देण्याचे काम सुरू आहे. कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटत असल्याने दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
शहरात संध्याछाया वृद्धाश्रमासह रामनगर परिसरात सुमन बालगृह आणि धनगरवाडी येथे एक बालगृह आहे. तसेच माळटेकडी परिसरातही एक वृद्धाश्रम आहे. आजघडीला संध्याछाया वृद्धाश्रमात २७ ज्येष्ठ नागरिक आहेत. यामध्ये महिला आणि पुरुषांचाही समवोश आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बाहेरच्या व्यक्तींना आत प्रवेश देण्यात येत नाही. तसेच यापूर्वी अनेकजण वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, तेरावी, स्मरणार्थ होणारे कार्यक्रम कोरोनामुळे पूर्णपणे बंद झाले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठांना कोरोनाची संसर्ग हाेऊ नये म्हणून कोणीही वृद्धाश्रमात प्रवेश करू नये, अशी सूचनाच संस्थेच्यावतीने लावली आहे. आजच्या परिस्थितीत दात्यांची संख्या घटली. त्याचबरोबर शासनाचे अनुदानही थकले आहे. अतिशय तुटपुंजे अनुदान शासन देते. परंतु, तेही वेळेवर मिळत नसल्याने वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचा सांभाळ करण्यात अडचणी येतात. परंतु, काही व्यक्ती दातृत्व भावनेतून नियमितपणे देणगी देतात. त्यातून हा प्रपंच चालतो.
मास्क अन् सॅनिटायझरही मिळेना
शहरातील वृद्धाश्रम आणि बालगृहात असलेल्या व्यक्ती आणि मुलींना मास्क, सॅनिटायझरदेखील उपलब्ध होत नाही. त्या ठिकाणी इतर व्यक्तींचा संपर्क जरी येत नसला तरी तेथे काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे प्रत्येकास मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
शासनाचे अनुदान थकले
वृद्धाश्रमांना शासनाकडून अतिशय तुटपुंजे अनुदान दिले जाते. पंरतु, ते वेळेत न देता ४ ते ५ वर्ष उशिराने मिळते. त्यामुळे वृद्धाश्रम केवळ देणग्या व दातृत्ववान व्यक्तींच्या भरवशावर चालविले जातात. शासनाने राज्यातील वृद्धाश्रमांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
निधीच्या अडचणीने परिणाम
सध्याच्या काळात पोषक आहार, फळांचे ज्यूस तसेच जीवनसत्त्वांची वाढ करणाऱ्या आहाराची गरज आहे. अशा परिस्थितीत वृद्धाश्रम आणि बालगृहात प्रत्यक्ष न जाता त्या संस्थेच्या पदाधिकारी अथवा व्यवस्थापक यांच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्याला शक्य होईल ती मदत करणे गरजेचे आहे. जेणेकरून तेथील व्यक्तींना चांगला आहार मिळेल.
वृद्धाश्रमात कोरोना टेस्ट
संध्याछाया वृद्धाश्रमात असलेल्यांची कोरोना चाचणी केली. त्यात सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जवळपास २७ जणांचे वास्तव्य असून यापुढील काळात त्यांना कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे.
दातृत्व भावनेतून प्रत्येकाने काम करावे
आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. तसेच वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील व्यक्तींना कशाचीही कमतरता पडणार नाही, हे आपले कर्तव्य असून ते पार पाडण्यासाठी दातृत्व भावनेतून जमेल ती मदत करावी. मदत ही पैसे स्वरूपातच असावी, असे काही नसते. काेणत्याही स्वरूपात करा.
- प्रा. भगवान सूर्यवंशी,
सामाजिक कार्यकर्ता
वृद्धाश्रमातील देणगीदारांची संख्या कमी झाली असली तरी नियमितपणे देणगी देणाऱ्यांकडून येणारा ओघ सुरू आहे. प्रत्यक्ष प्रवेश दिला जात नसल्याने होणारे कार्यक्रम बंद झाले आहे. असे नागरिक व्यवस्थापकांशी संपर्क साधून मदत करू शकतात. रोख, धान्य अथवा इतर स्वरूपातही मदत स्वीकारू.
-डाॅ. पी. डी. जोशी पाटोदेकर