कोरोना झालेली गर्भवती महिला आली असेल अन् सौम्य लक्षणे असल्यास गर्भवती महिलेवरची नियमित आणि कोरोनाची ट्रिटमेंट केली जाते; परंतु ऑक्सिजनस्तर कमी असल्यास मात्र फक्त कोरोनाचीच औषधी सुरू ठेवली जाते. अशा महिलांना ॲन्टिव्हायरल ड्रग द्यायचे नसतात; परंतु आईचा जीव वाचविण्यासाठी ते द्यावे लागतात. अशा रुग्णांसाठी आता स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. तसेच प्रसूतिगृहाचा चेहरामोहरा बदलला असून त्याचे संचालकांनीही कौतुक केल्याची प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ.एस.आर.वाकोडे यांनी दिली.
आईला झाला म्हणजे बाळाला होतोच असे नाही
गर्भवती महिलेला कोरोना झाला म्हणजे बाळालाही हाेतोच याबाबत अद्याप संशोधन झाले नाही. अशा महिलांची सीटीस्कॅन तपासणी करता येत नाही. त्यामुळे नेमकी तीव्रता कळत नाही. गर्भवती महिलेला रेमडेसिवीर दिले तर त्यापासून अपाय झाला, हेही कुठे सिद्ध झाले नाही. जगभरात अनेक महिलांना अशी इंजेक्शन्स दिली आहेत; परंतु त्यावरही संशोधन सुरू आहे. लक्षणे तीव्र असल्यास आईच्याच उपचाराला महत्त्व दिले जाते. कोरोना झाला म्हणून सिझेरियन करणे हेही चुकीचे आहे. फक्त खबरदारी घेण्याची गरज आहे. अशी प्रतिक्रिया स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. किशाेर अतनूरकर यांनी दिली.