ढगफुटीमुळे तालुक्यातील सावरगाव(न), बेरळी, देऊळगाव, मंगरूळ, बोरगाव, पांगरी, आडगाव, काबेगाव, हिप्परगा, आदी गावांतील कापूस, सोयाबीन, हळद, ज्वारी या पिकांमध्ये पाण्याचे तळे साचले असून, काही ठिकाणी पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे तालुक्यात कही खुशी, कही गम अशी परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी प्रभारी तहसीलदार राम बोरगावकर यांना पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. मंडल अधिकारी व तलाठी यांचे पंचनामे करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. ढगफुटीमुळे अनेक गावांतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते व पूल वाहून गेले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला एका नवीन त्रासाला समोर जावे लागत आहे.
विधानपरिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सावरगाव (न) येथे झालेल्या ढगफुटीमुळे वाहून गेलेल्या कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता अशोकराव यांनी सावरगाव(न) येथील पुलाची उंची वाढवण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले. मात्र, तालुक्यातील धानोरा (मक्ता) येथे देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली. मात्र, नदीवर पूल नसल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीला तीन ते चार फूट पाण्यातून दफनविधीसाठी न्यावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तालुक्यातील विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे धानोरा (मक्ता) नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
लोहा तालुक्यात पीआरसी समितीची भेट
तालुक्यात पीआरसी समितीत गटप्रमुख आमदार अनिल पाटील, आमदार किशोर दराडे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांनी भेट दिली असून, यात आरोग्य, हागणदारीमुक्त, पाणीपुरवठा, घरकुल या विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंबंधी गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. समितीने शिक्षण पशुसंवर्धन या विभागाचे कौतुक केले आहे.
सणासुदीच्या काळात पोलिसांच्या वतीने नागरिकांना आव्हान
तालुक्यात घरफोडी, मोटारसायकल, मोबाईल चोरी वाढल्यामुळे नागरिकांनी सणासुदीच्या काळात सतर्क राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनात लोहा ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, सोनखेडचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, उस्माननगरचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी आपल्या हद्दीतील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली. यातच माळाकोळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी आरोपी हरिओम मुंडे, रा. एकुर्का (खु), ता. जळकोट याच्याकडून सात मोटारसायकली जप्त केल्या. त्यामुळे तालुक्यातील अन्य मोटारसायकलची चोरी उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे.