नांदेड - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी त्यांच्या साथीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिसून येत आहेत. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहभागाने यात्रेत उत्साह संचारला होता. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आज नांदेडमध्ये दाखल झाले असून महाराष्ट्रातील राहुल गांधींची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये होत आहे. या सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच, राहुल गांधींच्या एनर्जीचं कौतुक करताना, यात्रेतून त्यांनी तरुणाईला दिलेल्या संदेशाला सलाम केला आहे.
नाना पटोले यांनी नांदेडमध्ये बोलताना म्हटले की, राहुल गांधींनी कन्याकुमारीतून आपल्या भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. त्यावेळीच त्यांनी देशाला संदेश दिला होता. भारत जोडो यात्रा ही राजकीय नसून देशाला एकतेत जोडण्यासाठी निघालेली चळवळ आहे. त्यांच्या या यात्रेतून तरुणाईला एक प्रेरणा मिळाली आहे. सकाळी लवकर उठून ते यात्रेची सुरुवात करतात. त्यामुळे, तरुणाईही लवकर उठून यात्रेत सहभागी होत आहे. सदृढ शरीर आणि आरोग्य हीच संपत्ती आहे. राहुल गांधींनी आपल्याला ती संपत्ती टिकवण्याचा मंत्र दिल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही एकच चळवळ आहे. इतर नेते जे करतात तो इव्हेंट असतो आणि ही यात्रा म्हणजे मूव्हमेंट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आईला भेटायला जातात, तेव्हा त्यांचा चेहरा कुठे असतो, मोदींचा चेहरा कॅमेऱ्याकडे असतो. मात्र, आपण सर्वांनीच पाहिलं आहे. भारत जोडो यात्रेत जेव्हा सोनिया गांधींनी सहभाग घेतला. त्यावेळी सोनिया गांधीच्या पायातील बुटाची लेस निघाली होती. राहुल गांधींनी खाली वाकून आईच्या पायातील बुटाची लेस बांधली. त्यावेळी, राहुल गांधींचा चेहरा कुठे होता, आपण सर्वांनीच पाहिलंय, राहुल गांधींचा चेहरा त्यांच्या आईच्या पायाशी होता, असे म्हणत नाना पटोले यांनी इव्हेंट आणि मूव्हमेंटमधील फरक सांगितला.
यात्रेत राष्ट्रवादीचा सहभाग
नांदेड शहरात आज दुपारी पदयात्रा दाखल झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे नेते खा. सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी यात्रेत सहभाग घेतला. त्यांच्या सहभागाने यात्रेस आणखी बळ मिळाल्याचे चित्र होते. खा. सुळे आणि जयंत पाटील यांनी यात्रेकरुंसोबत संवाद साधला. खा. सुळे मनमोकळ्या संवादासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांची गर्दी होती. यात्रा शिवाजी नगर येथे आली असता खा. सुळे यांना समोरील मार्गात प्लास्टिकचा बॅगचा कचरा दिसला. सर्वजण त्यावरून जात असताना खा. सुळे यांनी ती बॅग खाली वाकून उचलली. खूप गर्दी असतानाही रस्त्यात पडलेला कचरा दिसताच एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडत त्यांनी सहज प्लास्टिक बॅग उचलली. त्यांच्या या छोट्या कृतीने सहभागी सर्वांना मोठा संदेश दिला आहे. साधेपणासोबत खा. सुळे यांच्या जागरूकतेची चर्चा यानिमित्ताने यात्रेकरूंमध्ये सुरु होती.