- मारोती चिलपिपरे कंधार : मोबाईलवर बोलण्यामध्ये गुंग असलेल्या एका व्यक्तीच्या हातातील पिशवी ठेवलेले ६० हजार रुपये चोरट्याने हातोहात लांबवल्याची घटना कंधार शहरात २० मार्च रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी किसान धोंडीबा जाधव हे २० मार्च रोजी एसबीआय बँकेत गेले होते. खात्यावरील ६० हजार रुपये काढून त्यांनी पिशवीत ठेवले. त्यानंतर पायी चालत सरकारी दवाखान्यासमोरील न्यू मॉडर्न दुकानासमोर मोबाईलवर बोलत ते उभे राहिले. त्यांच्या दुसऱ्या हातामध्ये पैसे असलेली पिशवी होती. त्या दिवशी सोमवार असल्याने आठवडी बाजार आणि गर्दीही होती. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी जाधव यांच्या हातात पिशवी एका बाजूने कापली आणि त्यातील ६० हजार रुपये अलगद काढून पळ काढला.
मोबाईलवरील बोलणे झाल्यानंतर किसन जाधव हे पुढे बुलढाणा अर्बन बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेले, तेव्हा हातातील पिशवी एका बाजूने कापलेली दिसली आणि पिशवीत पैसे नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी चोरट्याचा शोध घेतला, मात्र त्यास उशीर झाला होता. याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आर.एस. पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.यु. गणाचार्य तपास करीत आहेत.