कंधार : तालुक्यात मार्च २०१९ च्या अहवालानुसार १० विभागांत अद्याप वयानुसार तीव्र कमी वजनाची १९३ बालके आहेत. सर्वात कमी संख्या पेठवडज - बारूळ या दोन विभागांत आहे. तर सर्वात जास्त संख्या उस्माननगर विभागात आहे. तालुका कुपोषण मुक्त कधी होणार? असा प्रश्न पालक व नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.तालुक्यात शून्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या २० हजार ४७२ एवढी आहे. यातील १६ हजार ८६७ बालकांचे वजन घेण्यात आले. त्यात साधारण श्रेणीत १५ हजार ८०० बालके आली. मध्यम तीव्र वजनाचे बालक ८७४ संख्या आढळली. परंतु तीव्र कमी कमी वजनाची बालकसंख्या १९३ समोर आली. त्यामुळे कुपोषणमुक्तीला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वप्राथमिक शिक्षण, नानाविध उपक्रम, जनजागृती, प्रबोधन, आरोग्य, आहार आदींच्या माध्यमातून कुपोषणमुक्तीचा प्रयत्न होतो. तरीही ते साध्य होत नाही.तालुक्यातील १० विभागांचा मार्च महिन्याचा अहवाल समोर आला आहे. त्यात वयानुसार तीव्र कमी वजनाच्या सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या उस्माननगर विभागात ३६ आहे. शेकापूर २९, कुरूळा २७, पानशेवडी २३, दिग्रस १७, रूई १६, चिखली १६, पानभोसी १४ अशी संख्या आहे. सर्वात कमी संख्या पेठवडज ७ व बारूळ ८ अशी आहे. उंचीनुसार तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या ३६ आहे. त्यात सर्वाधिक संख्या दिग्रस विभागात १३, कुरूळा ११, शेकापूर ४, उस्माननगर ४, चिखली २, रूई १, पानशेवडी १ आणि पानभोसी, पेठवडज व बारूळ विभागात एकही बालक नाही.
- आॅक्टोबर २०१७ मध्ये ३३७ बालके कुपोषित होती. जानेवारी २०१८ मध्ये २७० तर नोव्हेंबर २०१८ मध्ये २२६ बालके दहा विभागांत कुपोषित होती. मार्च २०१९ मध्ये १९३ बालके वयानुसार तीव्र कमी वजनाचे असल्याचे समोर आले. कुपोषित बालकांची संख्या घटली आहे. परंतु कुपोषणमुक्ती समूळ कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला. पथनाट्य, पोषण आहार सप्ताह, रॅली, जनजागृती आदी करूनही कुपोषणमुक्ती होत नाही. साहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडेच गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी पदाचा पदभार आहे. पंचायत समिती व बालविकास प्रकल्प कार्यालयाची कामे त्यांना मोठी करताना कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.