नांदेड - माहूर आमच कुलदैवत आहे त्यासाठी दर्शनाला आले. शिवशक्ती दर्शन यात्रेमध्ये राज्यातील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेणार असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. येत्या चार तारखेपासून ही यात्रा सुरू होणार नसल्याचे पंकजा यांनी सांगितले.
दोन महिन्यांची सुटी संपवून शिवशक्ती या राज्यव्यापी दौऱ्यापूर्वी माहूर गडावर दर्शनासाठी पंकजा मुंडे आल्या आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांना राखी केव्हा बांधणार या प्रश्नावर पंकजा यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली. महादेव जानकर, हे माझे भाऊ माझ्यासोबत असल्याचे पंकजा म्हणाल्या. जे लोकं मुंडे साहेब असताना आणि मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या पश्र्चात माझ्या संघर्षात सोबत होते ते आज माझ्यासोबत आहेत. राखी असा विषय असा आहे की कुणी म्हटले मला राखी बांधा तर आपण नाकारू शकत नाही. ही आपली संस्कृती आहे. रक्ताचे नाते नाकारता येत नाहीत. दर्शन झाल्यानंतर बाकीचे कार्यक्रम पार पाडू, असेही पंकजा यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे मागील दोन महिन्यांपासून राजकीय सुटीवर होत्या. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला अजित पवार यांची साथ लाभली. प्रथम शिवसेना आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आमदारांचा एक गट वेगळा होऊन भाजपासोबत सत्तेत बसला आहे. यामुळे राज्याचे राजकारण वेगळ्या टप्प्यावर आले आहे. यातच दोन महिन्यांची सुटी संपताच शिवशक्ती दौऱ्यातून देवदर्शनासह कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचे नियोजन करत पंकजा पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आशीर्वाद घेण्यासाठी पंकजा मुंडे माहूर गडाकडे रवाना झाल्या.