शहरी भागातील २५६ शाळा बंद, शहरी विद्यार्थ्यांचा ग्रामीणकडे ओढा
नगररचना विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रात २५६ शाळा आहेत; परंतु या शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावरून अद्यापपर्यंत कुठल्याही सूचना नसल्याने सदर शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील रुग्णसंख्या घटलेली असताना केवळ ग्रामीण भागातील शाळा सुरू करून शहरी भागातील शाळा बंद ठेवणे हा शहरी भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. याचाच परिणाम शाळांच्या पटसंख्येवर होत असून शहरी भागातील शाळांमधून दाखले काढून ग्रामीण भागात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शाळा बंद
दुसरी लाट ओसरल्यानंतर नियमावली घालून देत माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यात ५३७ शाळा सुरू झालेल्या असताना धर्माबाद तालुक्यातील पाटोदा गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने तेथील शाळा तात्काळ बंद करण्यात आली. सदर शाळा संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
तिसरी लाट आपणच रोखू शकतो
ग्रामीण भागातील शाळा सुरू झालेल्या असताना शहरी भागातून अपडाऊन करणारे शिक्षकच कोरोनाचे स्प्रेडर ठरू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून नियमितपणे शिक्षकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पालकांनीदेखील बाहेरगावी जाताना मास्क वापरणे, घरी आल्यानंतर स्वच्छ हात धुणे यासह कोरोना नियमावलींचे पालन करावे. जेणेकरून सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद करण्याची वेळ येणार नाही.
- वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड.