नांदेड : जिल्ह्यातून जाणाऱ्या अनेक राष्ट्रीय, राज्य महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. परंतु, ठरवून दिलेल्या वेळेत कोणत्याही रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला नांदेड-लातूर रस्ता कधी पूर्ण होणार, असा सवाल वाहनधारक उपस्थित करीत आहेत.
जिल्ह्यात नांदेड-मुखेड-बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अ च्या कामाला मे २०१८ला सुरुवात केली होती. हे काम रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनी करीत असून, त्यांनी काम वेळेत पूर्ण न केल्याने डिसेंबर २०२२ डेडलाईन दिली आहे. मुखेडलगतच्या मोती नदीवरील पुलाचे कामही रखडले आहे. कंधार तालुक्यातून जाणाऱ्या अंबुलगा - मुखेड मार्गाचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. वाजेगाव ते मुदखेड हा राज्य मार्ग प्रस्तावित असून, अंदाजे २०० कोटींचा हा रस्ता मंजूर झाला आहे. परंतु, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही; तर निजामाबाद ते उमरीपर्यंत रस्ता पूर्ण झाला आहे. परंतु, मुदखेड ते उमरीदरम्यान वन विभागाची जमीन असल्याने ५०० मीटरचा रस्ता प्रलंबित आहे.
देगलूर ते उदगीर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून, या महामार्गासाठी केंद्र शासनाचा देगलूर - उदगीर - रेणापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ मंजूर आहे. परंतु, निधी उपलब्ध नसल्याने काम रखडले आहे. मुदखेड ते कंदकुर्ती (तेलंगणा) जाणाऱ्या महामार्गाची कामे अद्याप रखडली आहेत. उमरीजवळ रेल्वे गेट भुयारी मार्गाचे काम अर्धवट आहे. सध्या पावसाळ्यात या ठिकाणी बासर, निजामाबाद, हैदराबाद येथे जाणारी अनेक वाहने अडकून पडत आहेत.
हदगाव ते लोहगाव फाट्यापर्यंत जाणाऱ्या महामार्गाचे काम उमरी ते लोहगाव फाटादरम्यान रखडले आहे. हिमायतनगर-इस्लामपूर किनवट महामार्ग क्र. १६२ चे काम गत चार वर्षांपासून सुरू आहे. ठेकेदाराकडून कामात दिरंगाई होत असून, काम बंद आहे. भोकर फाटा ते रहाटी या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्यास तब्बल पाच वर्षे लागली. या राष्ट्रीय महामार्गावर मातुळ शिवारात पुलाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहतूक ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.