नांदेड - काँग्रेस सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हा नरेंद्र मोदी विरोधात असताना म्हणत होते आपल्या देशाची सीमा सुरक्षित ठेवणं सरकारची जबाबदारी असते. देशात आरडीएक्स आलं कुठून असा सवाल तुम्ही विचारत होता. आज तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला. त्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्स देशात आलं कुठून याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये विचारला. गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा नांदेडमध्ये पार पडत आहे.
यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, मी ४ वर्षांपूर्वी बोललो होतो की निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. ते आज खरं ठरतंय. बालाकोट हवाई हल्ल्यात शत्रू राष्ट्राचे किती सैनिक मारले गेले ह्याचा आकडा हवाई दलाच्या प्रमुखांकडे पण नाहीत पण अमित शाह म्हणाले २५० माणसं मारली गेली. अमित शाहना कुठून मिळाला हा आकडा? देशाच्या सैन्यावर पूर्ण विश्वास आणि त्यांचा अभिमान आहे मात्र कुठे बॉम्ब टाकायचा असतो यासाठी विमानं प्रोग्रॅम्ड असतात, पायलट बघत नसतो, वैमानिकांना चुकीची माहिती दिली असा आरोप राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर केला.
भारतीय जनता पक्षाचे एक नेते म्हणतात की, सैन्याच्या कारवाईचे पुरावे जरी शहिदांच्या नातेवाईकांनी मागितले तर ते देशद्रोही आहेत. योदी आदित्यनाथ आपल्या सैन्याला 'मोदी सेना' म्हणतात, सरकार जवानांना वापरुन घेत आहेत. परवा नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले तेव्हाही मोदींनी शहीद जवानांचा वापर करत लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. हेच भाजपाचे राजकारण आहे असा आरोप राज यांनी केला.
संपूर्ण बहुमताचं सरकार देशाने मोदींच्या हातात दिलं पण त्यांनी काय केलं? नोटबंदी आणली, आधी एफडीआयला विरोध केला आता एफडीआय आणलं, जीएसटीला विरोध केला आणि आता जीएसटी आणून छोट्या व्यापारांच कंबरडं मोडलं. मोदी फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधींबद्दल बोलत आहेत. बेरोजगार तरुणांबद्दल कधी बोलणार? महिला सुरक्षेबद्दल कधी बोलणार? शेतकरी आत्महत्येबद्दल कधी बोलणार? असाही सवाल राज यांनी मोदींना केला.