- शेखर पाटीलमुखेड : पोहणे शिकण्यासाठी विहिरीत उतरलेल्या युवकाच्या कंबरेचा डबा निसटला आणि ४० फूट खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील सकनूर येथे घडली आहे. देविदास अशोकराव हंबीरे (१७) असे मयत युवकाचे नाव आहे.
सकनूर येथील रहिवासी आणि बाराहाळी येथील विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी वर्गात शिक्षण घेत असलेल्या देविदास हंबीरे याला पोहता येत नव्हते. पोहणे शिकण्याच्या उद्देशाने १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास देविदास हा गावाजवळील शेतातील विहिरीवर गेला. पाठीवर डबा बांधून तो विहिरीमध्ये उतरला; मात्र अचानक पाठीवर बांधलेला डब्बा निसटला आणि देविदास ४० फूट खोल पाण्यामध्ये बुडून मृत्यू पावला. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर लगेच विहिरीत शोध कार्य सुरू करण्यात आले. जीवरक्षक दलाच्या मदतीने चार तास प्रयत्न करून मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला. सायंकाळी देविदास हंबीरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तलाठ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.
देविदास अकरावी वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील कापड दुकानात मुनीम म्हणून काम करतात. या घटनेने हंबीरे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. मयत देविदास हंबीरे यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.