नांदेड : 'दुनिया मे सबसे जादा डर मीडिया से लगता है...', हे वाक्य आहेत महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे. नांदेड दौऱ्यावर आले असताना विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करताना पत्रकारांकडे बघून खास शैलीत त्यांनी फोटो चांगले काढा अन सर्व चांगले दाखवा असा टोला ही लगावला.
विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर राज्यपाल यांनी नियोजनात नसलेल्या गणित संकुलाची इमारत पाहण्यासाठी ऐनवेळी आग्रह धरला. त्यामुळे यंत्रणेची धावपळ उडाली. जिल्हाधिकारी इटनकर यांना धावतच संकुल गाठावे लागले. दरम्यान, भाषणात राज्यपाल कोशारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंगजी, सुभाषचंद्र बोस यासारखे महापुरुष माझ्यासाठी राम, कृष्ण या दैवताप्रमाणे आहेत. परंतु या महापुरुषांच्या बलिदानाचा आज विसर पडत चालला आहे हे दुर्दैव आहे, अशी खंत राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी व्यक्त केली. मला लोकांमध्ये मिसळून रहायला आवडते. लोकांमध्ये गेलेल्या अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. परंतु कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात कुठे जाता आले नाही. परंतु, गुरूगोविंद सिंगजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत येण्याची खूप इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे. असेही राज्यपाल म्हणाले.
माझ्या दौऱ्यावर कोण राजकारण करतायत ?राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या तीन जिल्ह्यातील दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे, याबाबत राज्यपाल यांना पत्रकारांनी छेडले असता, कोण राजकारण करीत आहेत, तुम्ही तर करत नाही ना असा उलट प्रश्न पत्रकारांना करून या विषयावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. दोन दिवसांपूर्वी परभणीचे पालकमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपाल यांच्या दौऱ्यात होणारे उदघाटन आणि बैठकांना आक्षेप घेतला होता. तर मंत्रिमंडळ बैठकीत ही दौऱ्या बाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे या विषयावर राज्यपाल नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष होते. परंतु राज्यपाल यांनी या विषयावर बोलणे टाळले.
महापौर, जि. प. अध्यक्षांनी केले राज्यपालांचे स्वागतराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेड, परभणी, हिंगोली दौऱ्याला राष्ट्रवादीने आक्षेप घेतला असला तरी नांदेडमध्ये राज्यपाल कोश्यारी यांचे आगमन झाल्यावर विमानतळावर शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर मोहिनी येवनकर यांनी स्वागत केले. यावेळी जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. भाजपचे आमदार राजेश पवार यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी अधिकाऱ्यांनी राज्यपालांचे विमानतळावर स्वागत केले.