नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, या पदासाठी दाखल अर्जांची छाननी अद्याप पूर्ण झाली नाही. ही प्रक्रिया एक महिना चालण्याची शक्यता असल्याने सध्या तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा कार्यकाळ संपल्याने हे पद रिक्त झाले आहे. सध्या येथील विद्यापीठाच्या कुलगरू पदाचा अतिरिक्त पदभार डॉ. प्रकाश महानवर यांच्याकडे आहे. दरम्यान, कुलगुरू पदासाठी १२२ अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जांची छाननी केली जात आहे. अर्जांची छाननी करण्यासाठी सर्च ॲण्ड सिलेक्शन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने छाननीचे काम सुरू केले आहे. छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी तारीख निश्चित केली जाईल.
या मुलाखतीतून कुलगुरू पदासाठीच्या पाच उमेदवारांची शिफारस राज्यपालकांकडे करण्यात येते. सध्या छाननीचेच काम पूर्ण झाले नाही. त्यासाठी साधारणत: आठवडाभराचा कालावधी लागेल, असे सांगण्यात येत आहे. छाननी त्यानंतर मुलाखती आणि त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची शिफारस या सर्व प्रक्रियेला किमान एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे नवीन कुलगुरू कोण असेल? याबद्दल उत्सुकता अधिकच ताणली जात आहे.