नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची जेवढी उत्सुकता ताणली गेली आहेत, तेवढीच चर्चाही वाढली आहे. शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून, कुलगुरुपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याची उत्सुकता लागली आहे. सोमवारी या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून छाननी व मुलाखती अंती पाच नावांची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली होती. नांदेड येथील डॉ. रामचंद्र मंठाळकर यांच्यासह पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील भौतिक शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय ढोले, पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे, याच विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.जी. चासकर आणि जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. ए.एम. महाजन यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. राज्यपालांच्या उपस्थितीत ६ फेब्रुवारी रोजी या पाचही उमेदवारांची मुलाखत पार पडली आहे. त्यामुळे राज्यपाल रमेश बैस कुलगुरु म्हणून कोणाच्या नावाची निवड करतात, याची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, यानिमित्त दोन दिवसांपासून चर्चा होत आहे. समाजमाध्यमांवर नावही जाहीर केले जात आहे. मात्र, राजभवनातून अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुटीचे असल्याने सोमवारी कुलगुरुपदाच्या नावाची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.