नांदेड : अनलॉकनंतर नांदेडातील बाजारपेठ मोकळी झाली असून चाकरमान्यांसह ग्रामीण भागातील जनतेची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात ऑटो रिक्षांचीही संख्या वाढताना दिसत आहे. शहर परवाना असलेले रिक्षाचालक साडेसात हजारांच्या आसपास आहेत. परंतु, नांदेडात दहा हजारांहून अधिक रिक्षा धावताना दिसतात. ग्रामीण भागातील रिक्षा व शहरी रिक्षाचालक यांच्यातील वादाचा सामना प्रवाशांना करावा लागतो.
नांदेड शहरात रिक्षा चालकांकडून होणारे गुन्हे अधिक प्रमाणात नसले तरी, त्यांच्याकडून केली जाणारी आरेरावी आणि प्रवाशांना मुजोरीच वादाचे मूळ कारण ठरत आहे. गुन्हे दाखल असलेल्या ऑटो रिक्षा चालकांत भाड्याने रिक्षा घेऊन चालविणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मूळ मालक असलेले रिक्षा चालक काेणत्याही वादात पडत नाहीत. त्यात ग्रामीण भागातून येणाऱ्या पॉईंटवर अधिक वाद असतात. तरोडा नाका, देगलूर नाका, हिंगोली नाका, गजानन महाराज मंदिर परिसर, लातूर फाटा असे पॉईंट आहेत.
नांदेडात प्रामाणिक रिक्षाचालकही;
सोने केले परत
नांदेड शहरात साडेसात हजाराहून अधिक परवानाधारक रिक्षाचालक आहेत. ज्यांच्याकडे शहरात रिक्षा चालविण्याचा परवाना आहे. अशातील बहुतांश मंडळी प्रामाणिक असल्याचे काही घटनांवरून लक्षात येते.
वजिराबाद ठाण्याच्या हद्दीत रिक्षामधून जाताना एका महिलेची दागिने असलेली पर्स रिक्षामध्येच विसरली, त्यानंतर या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु, ती पोहोचण्याअगोदरच रिक्षा चालकाकडून ती पर्स ठाण्यात जमा केलेली होती. अशाच एका घटनेत रिक्षात विसरलेली पैशांची बॅगही रिक्षा चालकाने परत केली होती.
विनापरवाना रिक्षाचालक, एक डोकेदुखी
शहरातील विनापरवाना रिक्षाचालक सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहेत. त्यांना कोणत्याही नियमांचे भान नसते, ते सुसाट असतात.
काही वर्षांपूर्वी शहर परवानाधारक रिक्षांना वाहतूक शाखेच्यावतीने विशेष स्टीकर देण्यात आले होते. परंतु, कालांतराने ते गायब झाले.
शहर वाहतूक शाखेवर आलेली मरगळ पाहता, आजघडीला ग्रामीण परवाना असलेल्या हजारो रिक्षा शहरातून सुसाट धावत आहेत.
काय काळजी घेणार?
प्रवाशांनी रिक्षामध्ये प्रवास करत असताना योग्य ती खबरदारी घ्यावी. महिला-मुलींनी रिक्षात प्रवास करत असताना रिक्षाचा नंबर नोट करून घ्यावा अथवा पालकाच्या मोबाईलवर सेंड करावा. काही चुकीची हालचाल वाटली, तर चौकात असलेल्या वाहतूक पोलिसांशी अथवा ठाण्यात संपर्क साधावा.
- चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक
रिक्षा चालकांनी नियमितपणे गणवेश वापरावा. रिक्षात प्रवास करत असताना प्रवाशांनी, चालक गणवेशात आहे की नाही, त्याचे ओळखपत्र, बॅच लावलेले आहे की नाही हे पाहावे. स्वत: रिक्षाचालक-मालक असलेल्यांना पांढरा, तर इतरांना खाकी गणवेश असतो.
- अविनाश राऊत, आरटीओ