केंद्र सरकारवर टीका करताना भाजप सरकारने ७ वर्षांत पूर्ण देश विकायला काढल्याची परिस्थिती असल्याचे सांगितले. देशाचा विकासदर रोज खाली येत आहे. केंद्राच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा फटका सामान्यांना बसत आहे. त्याचवेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही राजीनामा देऊन जात आहेत. कोरोनाचे संकट देशात असताना मोदी सरकारने डब्ल्यूएचओच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत पाच राज्यातील निवडणुका घेतल्या. त्याचवेळी अमेरिकेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम घेऊन देशात कोरोनाचा फैलाव केला, अशी टीकाही त्यांनी केली.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यातही केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. दिल्लीच्या सीमेवर १० महिन्यांपासून शेतकरी तळ ठोकून आहेत. त्यांच्या प्रश्नांवर बोलायला केंद्र सरकार तयार नसल्याचेही प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले. काँग्रेसने हाती घेतलेल्या व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान या कार्यक्रमाबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.
राज्यात दस्त नोंदणी होत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र हा निर्णय न्यायालयाच्या आदेशानंतर अस्तित्वात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. या विषयावर तोडगा काढू असेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील, सहप्रभारी संपतकुमार आदींची यावेळी उपस्थिती होती.