नांदेड : कोरोना काळात बंद केलेल्या पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची असलेली लूट कधी थांबणार, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
नांदेड विभागातून जवळपास ८० गाड्या चालविल्या जात आहेत. परंतु, त्यात विनाआरक्षित तिकीट घेऊन प्रवास करण्याची मुभा नाही. मात्र, प्रवाशांकडून अधिकचे पैसे घेऊन विनातिकीट प्रवास करण्याची मुभा तिकीट तपासणीक देत आहेत.
रेल्वे अधिकारी बोलेनात
विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची सुरू असलेली लूट आणि पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार यासंदर्भात रेल्वेचे कोणतेही अधिकारी बोलायला तयार नाहीत. रेल्वे बोर्डाकडून निर्णय आल्यानंतरच पॅसेंजर गाड्या सुरू होतील, असे जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले.
सुरू असलेल्या एक्स्प्रेस
नांदेड विभागातून जवळपास ८० विशेष रेल्वे सुरू आहेत. यामध्ये धर्माबाद-मराठवाडा एक्स्प्रेस, नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस, नांदेड-पुणे-पनवेल एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस, नांदेड-तिरुपती एक्स्प्रेस, नांदेड -श्रीगंगानगर, जालना-मुंबई जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम एक्स्प्रेसचा समावेश आहे.
बंद असलेल्या एक्स्प्रेस
नांदेड विभागातून बहुतांश एक्स्प्रेस धावत आहेत. परंतु, आजही नांदेड-तिरुपती, नांदेड-शिर्डी, नांदेड-काचीगुडा यासह विविध एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत.
नियमित धावणाऱ्या रेल्वेनाच विशेष रेल्वे म्हणून सोडण्यात येत आहे. मग आरक्षित तिकिटाशिवाय प्रवास करण्यास मुभा द्यावी. पूर्वीप्रमाणेच एक्स्प्रेस गाड्यांना तिकीट आकारावे. विशेष रेल्वेच्या नावाखाली जास्तीचे पैसे देऊन रेल्वे प्रवाशांची सुरू असलेली आर्थिक लूट रेल्वे प्रशासनाने थांबवावी.
- श्याम शिंदे
धर्माबाद-मनमाड एक्स्प्रेसने नांदेड ते जालना अपडाऊन करीत असतो. परंतु, रेल्वेकडून स्पेशल रेल्वेच्या नावाखाली इतर गाड्यांचे तिकीट वाढवून ठेवले आहे. त्यामुळे वेळेवर असलेल्या, परंतु अधिक तिकीट असल्यामुळे विशेष रेल्वेने प्रवास करणे परवडणारे नाही. त्यामुळे इतर गाड्या सुरू कराव्यात.
- गजानन तरोडेकर