विशाल सोनटक्के
नांदेड : साडेचार वर्षे सत्तेचा मलीदा लाटत एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहणारे सेना-भाजपा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकत्र आले हे महाराष्ट्राच्या दृष्टीने बरेच झाले़ यानिमित्ताने या दोन्ही पक्षांची सत्तेसाठीची लाचारी जनतेसमोर आल्याचे सांगत, साडेचार वर्षे सोबत घेतलेल्या रामदास आठवले, महादेव जानकारांचे या युतीमध्ये स्थान काय, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला़
बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराची रणधुमाळी नांदेड येथून संयुक्त प्रचारसभेने सुरु होत आहे़ या पार्श्वभूमीवर खा़चव्हाण ‘लोकमत’शी बोलत होते़ चव्हाण म्हणाले, ‘मागील साडेचार वर्र्षांतील युतीच्या कारभाराबाबत जनतेत संतापाची आणि फसवणूक झाल्याची भावना आहे़ खुद्द युतीतील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर नाराज आहेत़ तरीही सत्तेच्या लालसेने आज ना उद्या ते एकत्रित येतील असेच वाटत होते़ निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पाठिंबा काढून घेते की काय, या भीतीने सेनेच्या दारात भाजपा घिरट्या घालत होती़, तर आम्ही वेगळे आहोत हे दाखविण्यासाठी शिवसेना नाणार प्रकल्प, समृद्धी महामार्गाकडे बोट दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते़ मात्र कुठल्याही ठोस कारणाशिवाय हे दोन्ही पक्ष घाईघाईत एकत्रित आले़ युती करताना या दोघांनाही रामदास आठवले आणि महादेव जानकर यांची साधी आठवणही आली नाही़’ आम्हीच युतीअगोदर आघाडीची घोषणा केली असती, मात्र अजूनही प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांची वाट पाहत आहोत़ आंबेडकरांना चार जागा देण्याची आमची तयारी आहे़ राजू शेट्टींशीही आघाडीबाबत बोलणे सुरु असून दोघांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशाही चव्हाण यांनी बोलून दाखविली.दिल्लीतील बैठकीनंतर उमेदवारांची यादीकाँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांच्या याद्या तयार आहेत़ अंतिम निर्णयासाठी त्या पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येत आहेत़ उमेदवार यादीच्या छाननीसाठीची दिल्ली येथे पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होईल़ त्यानंतर लगेचच महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.