- रामेश्वर काकडेनांदेड: गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या दराने तेजी घेतली असून हळदीला सोन्याची झळाळी आली आहे. परंतु नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील हळदीच्या दरात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने खरेदीदाराकडून असा दुजाभाव का असा प्रश्न विचारला जात आहे.
नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गुरुवार १० ऑगस्ट रोजी आजपर्यंतचा सर्वोच्च २७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला आहे. हा दर मागील काही वर्षांतील सर्वोच्च असल्याचे शेतकरी सांगत आहेत. असे असले तरी शेजारील जिल्हा असलेल्या हिंगोलीतील वसमत मार्केट यार्डामध्ये नांदेडपेक्षा जादा दराने हळदीची खरेदी करण्यात येत आहे. वसमतनगर बाजारात गुरुवारी झालेल्या जाहीर लिलावात हळदीला सर्वोच्च ३५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला.
या दरवाढीचा बहुतांश मोठ्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळत असल्याचे दिसून येते. असे असले तरी नांदेडपासून केवळ २५ किमी अंतरावर असलेल्या वसमत बाजारपेठेत नांदेडपेक्षा सात ते साडेसात हजार रुपये जादा दर मिळत आहे. त्यामुळे दोन्ही मार्केटमधील दरामध्ये एवढी तफावत कशामुळे अशी चर्चाही नांदेडच्या मार्केट यार्डात ऐकावयास मिळत आहे. सध्या हळदीच्या दरात मोठी तेजी असली तरी त्याचा लाभ बहुतांश साठेबाजी केलेल्या बड्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांनाच मिळत आहे.
गेल्या चार वर्षांपासून हळदीला सातत्याने कमी दर मिळाल्याने हळद उत्पादक मोठ्या अडचणीत सापडला होता. मान्सूनने महिनाभर उशिरा आल्याने पेरण्या तब्बल दीड महिना उशिराने झाल्या. त्याचा परिणाम उत्पन्न कमी होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भविष्यात हळदीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो त्यामुळे हळदीचे ॲडव्हान्स सौदे झाल्याने बाजारात तेजी कायम असल्याचे चित्र आहे.
तेजी कायम सध्या बाजारात हळदीला विक्रमी तेजी आली असून हळदीने ३० हजार रुपयांचा उच्चांक गाठला आहे़. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून हळदीतील तेजी कायम असल्याने कमोडिटी वायदे बाजार हा पोषक ठरला आहे़.- प्रल्हाद इंगोले कृषी अभ्यासक