नांदेड: घरातून कामाच्या ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणावरून घरी सुरक्षित पोहचूत की नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सरत्या आठवड्यात मनाला वेदना देतील असे पाच अपघात झाले. छोट्या अपघाताची तर गिणतीच नाही. आठ दिवसांत पाच अपघातात ९ जणांचा बळी गेला आहे. सरासरी दररोज एक अपघात बळी जात असल्याने मरण का स्वस्त झाले? असा प्रश्न उपस्थित होतोय. यंत्रणेला दोष द्यायचा की स्वतःला ? यावर आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सरत्या आठवड्यात शनिवारची ती रात्र गावाकडे परतणाऱ्या मजुरांसाठी काळरात्र ठरली. हिमायतनगर तालुक्यात कामाच्या शोधात आलेले पश्चिम बंगालचे मजूर ट्रकने गावाकडे परत जात होते. त्याचवेळी समोरुन आलेल्या ट्रकची आणि मजुरांच्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन पाच मजूर ठार झाले.
याच आठवड्यातील पार्डीचा अपघात तर अनेकांच्या मनाला चटका लावणारा ठरला. भरधाव वेगातील ट्रकने रस्त्याशेजारच्या घरात घुसून एका युवतीला चिरडले. उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या वर्षा माणिक मदने हिला कोणताही दोष अथवा चूक नसताना अपघात बळी ठरावे लागले, ही बाब दुर्दैवीच आहे.
या दोन मोठ्या अपघातांसह हदगाव तालुक्यात बस टेम्पोवर धडकून मजुराचा मृत्यू, मुखेड तालुक्यातील जांब येथे बस दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू आणि भोकर तालुक्यात बारडजवळ ट्रक-दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू असे पाच अपघात झाले असून, त्यात ९ जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत.
मागील काही वर्षात रस्ते अपघात वाढले. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. रस्ते अपघातांची कारणमीमांसा केली तर अनेक वेगवेगळी कारणे समोर येतील. कोणी खराब रस्त्यांचे कारण पुढे करेल तर कोणी वाहनांच्या अतिवेग, चालकाचा निष्काळजीपणा, यंत्रणेचे दुर्लक्ष, कालबाह्य वाहनांचा वापर, अशी कितीतरी कारणे देऊन वेळ मारून नेली जाईल. पण त्याने गेलेला जीव परत येणार का? याचे उत्तर नकारार्थीच मिळणार. त्यामुळे वाढत्या अपघातांवर सकारात्मक विचार करून यंत्रणा बदलायची की वाहतूक नियम पाळण्यासाठी आपण बदलायचे? याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
२३ ते ३० सप्टेंबरमधील अपघातदिनांक मयत जखमी२४ सप्टेंबर ५ ५२६ सप्टेंबर १ १४२६ सप्टेंबर १ ०२७ सप्टेंबर १ ०१९ सप्टेंबर १ १एकूण ९ १५