श्रीक्षेत्र माहूर : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटल्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून या वन्य जिवाच्या शिकारीही केल्या जात आहे़ असे असले तरी वनविभाग मात्र याविषयी अद्यापही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.वन्यजीव जंगलाबाहेर पडू नये यासाठी वनविभागाच्या वतीने माहूर तालुक्यातील जंगल शिवारामध्ये कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले़ मात्र, देखभाल व दुरुस्तीअभावी या पाणवठ्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. या पाणवठ्यामध्ये नियमित पाण्याची व्यवस्था केली जाते किंवा नाही हादेखील संशोधनाचा विषय ठरला आहे. माहूर तालुक्यातील जंगल शिवारामध्ये वन्यजिवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात बिबट्या, हरीण, मोर, ससे, रानडुक्कर, रोही, नीलगाय यांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने या वन्यजिवांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.पाण्याच्या शोधात वन्यजीव अनेकदा लोकवस्तीकडे धाव घेतात़ त्यातून मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी पडते़हा संघर्ष टाळण्यासाठी माहूर वनविभागाकडून कोणत्याही उपाययोजना गांभीर्याने केल्या जात नसल्याचे दरवर्षीच दिसून येते़ परिणामी गेल्या काही वर्षांत माहूर तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यात अनेकजण बळी ठरले होते.माहूर तालुक्यात अस्वलाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याच्या शोधत हे अस्वल लोकवस्त्यापर्यंत पोहोचतात़ त्यातून गंभीर घटना घडतात. जंगलात असलेल्या पाणवठ्याची व्यवस्थित देखभाल दुरुस्ती झाल्यास मानव व वन्यजीव संघषार्ला पूर्णविराम मिळू शकतो़ परंतु, पाणवठ्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. वाई बा.ते वानोळा रस्त्यावर अनेकदा वन्यजिवाचे दर्शन होते़ या भागात मोरांचीही संख्या जास्त आहे़मोर व सशांवर शिकाऱ्यांचा डोळामाहूर तालुक्यातील जंगलामध्ये मोर व सशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या दोन प्राण्यांवर शिकाºयांचा कायम डोळा असतो. या प्राण्याच्या मांसाला जास्त किंमत मिळत असल्याने त्याची शिकार करून त्याचे मांस विकण्याचा गोरखधंदा पवनाळा, हडसनी, मेंडकी, मुंगशी, तांदळा, दिगडी धा.या परिसरात मोठ्या प्रमाणात केल्या जात असल्याची चर्चा आहे. हा भाग दुर्गम असल्याने या प्रकाराकडे वनविभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या शिकारीमुळे प्राण्याची संख्या कमी होण्याची भीती वन्यजीव प्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.
पाणवठे आटल्याने वन्य जीव रस्त्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:34 AM
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटल्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात रस्त्यावर येत आहेत.
ठळक मुद्देशिकारी वाढल्या वनविभागाचे दुर्लक्ष, पाणवठ्याचे व्यवस्थापन नाही