- प्रकाश गीते (बहादरपुरा, जि़. नांदेड)
मौजे बाबूळगाव ताक़ंधार येथील हरिभाऊ जेलेवाड या शेतकऱ्याने वन्य प्राण्यांकडून शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी अफलातून शक्कल लढविली़ कुलरच्या प्लास्टीक पात्यांचा वापर करून त्यांनी यंत्र बनविले व यापासून पिकांचे होणारे नुकसान टाळण्यात यश प्राप्त केले़ पात्यांची किंमत अवघी ५० रुपये आहे़
हरिभाऊ जेलेवाड यांची ५ एकर वहित शेती बोरी-बाबूळगाव गावच्या सीमेवर आहे़ याच भागात वनपरीक्षेत्र आहे़ भौगोलिक भाग डोंगराळ, माळरान, गर्द झाडी झुडूपे असून याचाच आसरा घेत रानडुक्कर, रोही, हरीण आदी वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे़ हे प्राणी कोवळी पिके खातात़ रानडुक्कर ज्वारी, सोयाबीन, मूग, उडदाचे नुकसान करीत असल्याने हरिभाऊ त्रस्त झाले होते़ वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या राखणीसाठी रात्रभर शेतात जागरण करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती़
यातून धडा घेत त्यांनी अफलातून युक्ती शोधली़ कसलाही आवाज सतत केला तर वन्यप्राणी जवळ येणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी कुलरची प्लास्टीक पाते, एक अर्धाफूट लांबीचा व पाव इंच जाडीचा बांबूचा तुकडा, घरातीलच वापराची प्लेट, दोन कडक तार आदी साहित्य जमा करून बांबूच्या आतील पोकळ भागातून रॉड टाकला़ दोन्ही बाजूला पाण्याच्या बाटलीची झाकणे बसवण्यात आली़ एका बाजूला फॅनचे पाते तर मागच्या बाजुच्या लाकडाला स्क्रूच्या सहाय्याने प्लेट फिट केली़ याच बाजूला एक कडक तार बसवण्यात आली़ हवेच्या सहाय्याने फॅनचे पाते फिरले की मागच्या बाजुस बसवलेला तार हा प्लेटवर आदळून आवाज येतो़ या आवाजामुळे वन्यप्राणी घाबरून शेतीत फिरकत सुद्धा नाहीत़ या उपकरणामुळे यंदा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त झाला़ आणि जेवढी पिके आली तेवढी पदरात पडली असे हरिभाऊ यांनी सांगितले़