विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड जिल्हा हा नेहमीच चळवळीचा गड राहिलेला आहे़ त्यामुळेच निवडणुकीत सर्वच पक्षांना आपल्या ध्वजासोबत निळा ध्वजही लावावा लागतो़ मात्र शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर हरिहरराव सोनुले यांनी केलेली विजयाची ऐतिहासिक नोंद वगळता गटबाजी आणि मतविभागणी यामुळे चळवळीची पिछेहाट झाली़ सध्या चळवळीतील नवी पिढी पुन्हा मोर्चेबांधणी करताना दिसते़मतदार संघ पुनर्रचनेनुसार जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ आहेत़ तर जिल्हा ३ लोकसभा मतदारसंघामध्ये विभागला गेलेला आहे़ २००९ च्या जनगणनेतील सामाजिक स्थिती पाहता जिल्ह्यात सर्वसाधारण वर्ग २२़२० टक्के, इतर मागासवर्ग २७़८५ टक्के, अनुसूचित जाती १८़९३ टक्के, अनुसूचित जमाती ६़९१ टक्के तर इतर समाज ज्याची लोकसंख्या २४़११ टक्के इतकी आहे़ जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीचा इतिहासही देदीप्यमान असल्याने केवळ नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी हा जिल्हा खुणावताना दिसतो़डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने निवडणुकीच्या राजकारणात प्रारंभी दमदार यश मिळविले होते़ १९५७ च्या निवडणुकीत फेडरेशनने ६़२३ टक्के मते मिळवित १३ जागा जिंकल्या होत्या़ त्यानंतर १९६२ च्या निवडणुकीत ३ जागांवर तर १९६७ च्या निवडणुकीत रिपाइंच्या तिकिटावर ५ जागी यश मिळविले होते़ त्यामुळेच नांदेड जिल्ह्यातही कार्यकर्ते सक्रिय झाले होते़ नांदेड लोकसभा मतदारसंघ १९५१ ला हैदराबाद प्रांतात होता़ त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या गोविंदराम मेश्राम यांनी १५़२५ टक्के मते मिळवित चुरशीची लढत दिली होती़ मतदारसंघात मिळालेली घवघवीत मते चळवळीचा आत्मविश्वास वाढविणारी ठरली़ त्यानंतर १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्याच हरिहरराव सोनुले यांनी २४़७१ टक्के मते मिळवित लोकसभेत प्रवेश मिळविला़ हा विजय आंबेडकरी चळवळीसाठी मैलाचा दगड ठरला़ मात्र येथूनच कार्यकर्त्यांच्या राजकीय अपेक्षा वाढल्या आणि चळवळीतील कार्यकर्ते एकमेकांसमोर रिंगणात उभे राहू लागले़ पर्यायाने लक्षवेधी मते घेवूनही चळवळीतील कार्यकर्त्याला त्यानंतर ना विधानसभा गाठता आली, ना लोकसभा़ १९८० च्या निवडणुकीत रिपाइं गवई गटाच्या उमेदवाराला १० हजार ३७५ मतांवर समाधान मानावे लागले़ मात्र जिल्ह्यात चळवळीतील मतदारांची मजबूत व्होटबँक असल्याने प्रकाश आंबेडकरही नांदेडकडे आकर्षिले गेले़ अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना १९८७ मध्ये त्यांनी तब्बल १ लाख ७१ हजारांहून अधिक मते खेचली होती़ त्यानंतरच्या निवडणुकात भारिप, रिपाइंबरोबरच बसपा आणि इतर पक्षांचे उमेदवारही रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकत गेले़ हा सिलसिला पुढे कायम राहिला़ विधानसभा निवडणुकीतही चळवळीतील उमेदवारांनी लक्षवेधी मते खेचली़ तत्कालीन भारिपच्या सुरेश गायकवाड यांनी १९९० ला २५ हजाराहून अधिक मते खेचली तर १९९५ ला त्यांच्या पारड्यात ३३ हजार मते पडली होती़ जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघातून किशोर केसराळे, गणेश राठोड, नागनाथ गित्ते यांच्यासह जाकेर चाऊस यांनीही चुरशीच्या लढती दिल्या़ मात्र त्यानंतर आर्थिक, रचनात्मक कार्यक्रमाअभावी चळवळ जोमात असूनही निवडणूक फडात मात्र कार्यकर्त्यांना फारसे यश मिळाले नाही.