भाजपा नेते अशोक सूर्यवंशी पाटील यांनी उपाध्यक्षपदाचा तिढा सोडविण्यासाठी तीन उपाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला होता. तसा करार झाल्याने त्यानुसार कार्यकाळ वाटून देण्यात आला. पहिल्यांदा उपाध्यक्ष म्हणून श्रीनिवास नेम्मानीवार यांना अठरा महिन्यांचा कालावधी दिला होता. त्यांनी दोन महिने उपाध्यक्षपद जास्तीचे उपभोगल्याने चाडावार यांनाही आपल्यालाही जास्तीचा कार्यकाळ उपभोगता यावा म्हणून प्रयत्नात आहेत. जेव्हा चाडावार यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता या दरम्यान नगरसेवकांना देवदर्शनासाठी नेण्याची वेळ चाडावार यांच्यावर आली होती. तेव्हा त्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे आता चाडावार यांच्या राजीनाम्यानंतर होऊ घातलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भावी उपाध्यक्ष व्यंकट नेम्मानीवार यांना ती झळ सोसावी लागेल की नाही ? हे सांगणे कठीण झाले. उपाध्यक्ष अजय चाडावार यांना उपाध्यक्षपदाचे सध्याचे दावेदार व्यंकट नेम्मानीवार यांनी योग्य प्रकारे मदत केली नसल्याने अजय चाडावारांची काय भूमिका राहील हेही सांगणे कठीण झाले आहे. पक्षश्रेष्ठींकडून राजीनामा देण्यासाठी दबाव सुरू झाला, मात्र आज तरी अजय चाडावार हे उपाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत नाहीत.
मात्र, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार भीमराव केराम यांनी हस्तक्षेप केला तर निर्विवादपणे व्यंकट नेम्मानीवार यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यातून त्यांना आर्थिक झळही बसणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. तसे झाले तर लक्ष्मीदर्शनासाठी आतुर असलेल्या नगरसेवकांच्या अपेक्षेवर पाणी फेरणार आहे.
नगरपालिकेत पन्नास टक्के महिला असताना उपाध्यक्षपदासाठी करारात महिलांना पक्षाकडून स्थान देण्यात आले नाही. यावेळी एखाद्या महिलेला उपाध्यक्षपदाची पक्षश्रेष्ठींनी संधी द्यावी, अशी चर्चा सुरू आहे