नांदेड : दरवर्षी महाराष्ट्र राज्यासह देशभरातून लाखो क्विंटल साखर दुसऱ्या देशांत निर्यात केली जाते; पण या हंगामात केंद्र सरकारने साखर कारखानदारांना देण्यात येणारा एक्सपोर्ट परवाना बंद केल्याने राज्यात साखरेचे भाव पडले आहेत. ३६ ते ३७ रुपये प्रतिकिलोवर पोहोचलेले साखरेचे भाव आजघडीला ३३.६० रुपयांवर येऊन ठेपले आहेत.
राज्यात मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होते. तर सदर साखर इतर देशांत निर्यात करण्यासाठी केंद्र शासनाकडून परवानगी दिली जाते. परंतु, यावर्षी साखरेची निर्यात करण्यासाठी सरकारने राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना निर्यातीसाठी परवानाच दिला नाही. त्याचा परिणाम मागील वर्षी कारखान्याकडे असलेला साखरेचा मुबलक साठा तसेच यावर्षी होणारे उत्पन्न असा दोन वर्षांचा साखरेचा साठा असणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होऊनही निर्यातीवर बंदी आणली. त्यामुळे बाजारात साखरेचे भाव उतरल्यामुळे राज्य आणि देशातील साखर कारखानदारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे.
यावर्षी एमएसपी ‘जैसे थे’दरवर्षी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिटन उसासाठी देण्यात येणारा एफआरपी जाहीर करण्यात येतो. यावर्षीही उसाचा एफआरपी जाहीर करण्यात आला आहे. परंतु, कारखान्यासाठी केंद्र शासनाने यंदा एमएसपी जाहीर केलाच नाही. त्यामुळे कारखानदारांसाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
उत्पादन वाढले अन् मागणी कमीराज्यात गतवर्षीचा लाखो क्विंटल साखरेचा साठा कारखान्याकडे पडून आहे. शिवाय यावर्षीचा हंगाम सुरू झाला असून, मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होणार आहे. उत्पादित केलेल्या साखरेची निर्यात केल्यास बाजारातील दर कायम राहतात. परंतु, यावर्षी निर्यातीसाठी बंदी घातल्याने उत्पादन वाढूनही मागणी घटल्याने लाखो क्विंटल साखरेचा साठा शिल्लक राहणार आहे.