नांदेड -नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाडेगाव शिवारात बुलेटवर बसून दोघेजण गांजाच्या पुड्या विक्री करीत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारुन दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २ किलो ३८६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
अधिक चौकशीत गांजा विक्रीची म्होरक्या ही महिला निघाली. आता या तिघांविरुद्धही एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. द्वारकादास चिखलीकर यांना अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले होते. ८ मे रोजी चिखलीकर यांना खबऱ्याकडून गांजा विक्री करणाऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीचे पथक गाडेगाव रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ पोहचले. या ठिकाणी फेरोजखान महेबुब खान रा. टायर बोर्ड आणि प्रमोद दिलीप सोनकांबळे रा.लिंबोनी नगर हे दोघेजण एका बुलेटवर पोत्यात गांजाची पाकिटे भरुन विक्री करीत होते. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पोत्यातील २३१ गांजाची पाकिटे आणि बुलेट जप्त केली. आरोपींकडे गांजा कुठून आणला?याबाबत चौकशी केली असता जोहराबी उर्फ बब्बाखाला अन्वर खान पठाण रा. टायर बोर्ड या महिलेने गांजाच्या पुड्या तयार करुन विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यावरुन तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून गांजाची विक्रीजोहराबी ही महिला गांजाची छोटी छोटी पाकिटे तयार करुन आपल्या हस्तकामार्फत त्याची विक्री करीत होती. पोलिसांच्या कारवाईनंतर गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. कारवाई केलेल्या पथकात सपोनि पांडुरंग माने, पो.उप.नि. दत्तात्रय काळे, गंगाधर कदम, अफजल पठाण, विलास कदम, मोतीराम पवार, रणभीर राजबन्सी, शंकर केंद्रे, हनुमानसिंह ठाकूर, बिचकुले यांचा समावेश होता.