नांदेड : अनैतिक संबंधाच्या आरोपातून एका महिलेला चार महिलांनी ग्रामस्थांसमोर दोरीने बांधून व डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण केल्याची घटना ९ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील आसोली येथे घडली़ या मारहाणीचा व्हिडीओ गुरुवारी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात चार महिलांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
मनीषा (नाव बदलले) ही महिला पती व दोन मुलांसोबत आसोली येथे राहते़ तिचे गावातील एकाशी गेल्या तीन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याच्या आरोपातून मार्च महिन्यात गावातील प्रतिष्ठीत मंडळींनी बैठक घेवून तिला व तिच्या प्रियकराला बोलविले होते़ यावेळी हे नाते पुढे न ठेवण्याचे सर्वांसमक्ष ठरविण्यात आले़ तिला प्रियकराकडून तिला २ लाख २० रुपये देण्यात आले़ प्रकरण मिटल्यानंतर ती माहेरी गेली होती़ त्यानंतरही तिचा प्रियकर वारंवार फोन करीत होता़ ९ एप्रिल रोजी दुपारी १२च्या सुमारास ती आॅटो करुन आसोली येथे प्रियकराच्या घरी गेली़ यावेळी संतप्त झालेल्या प्रियकराच्या पत्नीने इतर तीन महिलांच्या मदतीने तिला शिवीगाळ केली़ त्यानंतर हात आणि पाय दोरीने बांधून घरासमोरच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली़ तसेच डोळ्यात मिरची पूडही टाकली़ हा सर्व प्रकार ग्रामस्थांच्या समोरच सुरु होता़ त्यानंतर सरपंच व इतर मंडळींनी मध्यस्थी करुन तिची सोडवणूक केली़
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून तिला वाई येथील रुग्णालयात दाखल केले़ तिच्या जवाबावरुन तीन दिवसांपूर्वीच मारहाण करणा-या ललिताबाई चव्हाण, सुमित्राबाई चव्हाण, रुक्माबाई राठोड व शांतीबाई चव्हाण या महिलांच्या विरोधात सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली़
...तर आत्महत्या करण्याचा इशारापोलिसांच्या कारवाईमुळे समाधान न झालेल्या मनीषाने बुधवारी नांदेड गाठले़ पोलीस अधीक्षकांची भेट घेवून आपली कैफीयत मांडली़ मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला. दुसरीकडे या मारहाणीचा व्हिडीओ गुरुवारी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. बलात्काराचा गुन्हा दाखल
महिलेशी अनैतिक संबंधाचा आरोप असलेल्या फुलसिंग चव्हाण याच्या विरोधात सिंदखेड ठाण्यात गुरुवारी रात्री बलात्काराचा गुन्हा नोंदवला. आरोपीला तपासणीसाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. महिलेने चटणी अंगावर टाकल्यामुळे आणखी तीन मुलींची नावे घेतली होती. त्या अल्पवयीन असल्यामुळे चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले.