धनेगाव येथे दुचाकी लांबविली
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनेगाव येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्याने लांबविली. ही घटना २९ एप्रिल रोजी घडली. हरिश प्रल्हाद गायकवाड यांनी पंकजनगर येथे घरासमोर एम.एच.२६, ई ६१८५ या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. २५ हजार रुपये किमतीची ही दुचाकी लांबविण्यात आली. या प्रकरणात ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
शेतातील पाण्याची मोटार चोरीला
लोहा तालुक्यातील शेवडी येथे शेतातील पाण्याची मोटार चोरट्याने लांबविली. ही घटना ३० एप्रिल रोजी घडली. रुख्माजी सुभाष बहणे यांनी शेतात साडेसात एचपीची मोटार लावली होती. अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपये किमतीची ही मोटार लंपास केली. या प्रकरणात सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फळविक्रेत्याची अधिकाऱ्याला शिवीगाळ
नांदेड : किनवट शहरातील शिवाजी चौक भागात लॉकडाऊन असताना, रस्त्यावर फळविक्री करणाऱ्याला रोखले असता, त्याने नगरपरिषदेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करीत कॉलर पकडली. या प्रकरणात किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन असताना शिवाजी चौक भागात रस्त्यावर फळाचा गाडा लावून विक्री करीत होता. यावेळी नगरपरिषदेचे कर निर्धारक व्यंकट सेवनकर हे इतर कर्मचाऱ्यासह त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांनी फळविक्री बंद करून घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या फळ विक्रेत्याने सेवनकर यांना शिवीगाळ करीत त्यांची कॉलर पकडली. इतर कर्मचार्यांनी सेवनकर यांची सुटका केली, परंतु तोपर्यंत आरोपी पळाला होता.
उस्मानपुरा भागात मटका अड्डयावर धाड
शहरातील उस्मानपुरा भागात सुरू असलेल्या मटका अड्डयावर पोलिसांनी धाड मारली. या ठिकाणी मिलन डे नावाचा मटका सुरू होता. ४ मे रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी दीड हजार रुपये जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात इतवारा पाेलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.