इस्लापूर : पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार लक्ष वेधून काहीच कारवाई न झाल्याने इस्लापूरच्या संतप्त महिलांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकल्याची घटना २६ मार्च रोजी घडली.इस्लापुरात तीव्र पाणीटंचाई चालू असून नळयोजना बंद आहे़ सरपंच म्हणतात पाईप फिटींग चालू आहे़ त्यात सहस्त्रकुंड येथे पाणीसाठा कमी आहे़ ग्रामविकास अधिकारी पानपट्टे यांना विचारणा केली असता माझी बदली झाल्याचे ते सांगत आहेत. ग्रा़पं़ला कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती आहे़ दरम्यान, २६ मार्च रोजी इस्लापूर ग्रामपंचायतला कुलूप ठोकणार, अशा आशयाचे निवेदन देण्यासाठी काही महिला ग्रामपंचायतमध्ये आल्या होत्या. महिलांने निवेदन स्वीकारण्यास ग्रामपंचायतचे कोणीही पदाधिकारी पुढे न आल्याने महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकले.आंदोलनात सत्यभामा पंदिलवाड, बरडे, अखिला खयुम शेख, करुणा शेळके, कलावती हनवते, पद्मीन घुगे, उत्तम मोरे, सोजरबाई पंदिलवाड, रजिया शेख, खादीरबाई, अखिलाबाई, आम्रपाली शेळके, रफीक पटेल, विजय कांबळे आदींनी सहभाग नोंदविला.
इस्लापूर ग्रामपंचायतला महिलांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:20 AM