महिलांना हवा हक्काचा वाटा! काँग्रेस महिला आघाडीची हायकमांडकडे १४ टक्के जागांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 01:52 PM2024-10-20T13:52:47+5:302024-10-20T13:53:56+5:30
काँग्रेसला मिळालेल्या १०० जागांपैकी किमान १४ जागांवर महिलांना संधी द्यावी, असा आग्रह राज्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी दिल्ली दरबारी काँग्रेस हायकमांडकडे धरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड: विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने आता उमेदवारी आणि जागा वाटपाच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीमध्ये २८८ पैकी २६० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. काँग्रेसला मिळालेल्या १०० जागांपैकी किमान १४ जागांवर महिलांना संधी द्यावी, असा आग्रह राज्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी दिल्ली दरबारी काँग्रेस हायकमांडकडे धरला आहे.
लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या अनुषंगाने मांडलेल्या विधेयकाला काँग्रेसने समर्थन दिलेले आहे. त्यामुळे काँग्रेस महिलांना संधी देईल, अशी अपेक्षा पदाधिकारी महिलांना आहे. त्यासाठी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्यासह प्रदेश उपाध्यक्षा विद्या पाटील-लातूर, उपाध्यक्षा डॉ. रेखा पाटील चव्हाण-नांदेड, उपाध्यक्षा प्रतिमा उके-उमरेड यांच्यासह काही जिल्हाध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत ठाण मांडून आहे. या शिष्टमंडळाने काँग्रेसचे महासचिव तथा वरिष्ठ निरीक्षक मुकुल वासनिक यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र काँग्रेस महिला आघाडीच्या कार्याचा लेखाजोखा सादर केला आहे. शिष्टमंडळ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचीही भेट घेणार असल्याचे समजते.