लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महिला बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाची चळवळ जिल्ह्यात मूळ धरत आहे. मात्र या महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्या उभारणीमध्ये अडथळ्यांचे डोंगर उभे केले जात असल्याने महिलांच्या विकासाच्या या चळवळीत अडथळे निर्माण होत आहेत. बचत खाते काढून देण्याबाबतही जिल्ह्यातील बँकांकडून सहकार्य केले जात नसल्याच्या बचतगट महिलांच्या तक्रारी आहेत.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १८१ गावांमध्ये बचतगट चळवळीने जोर धरला आहे. या गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात महिलांचे १७२६ स्वयंचलित गट तयार झाले असून याच्याशी २० हजारांहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. अत्यंत छोट्या पातळीवर गट उभारुन स्वयंरोजगारासाठी या महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे. विशेष म्हणजे, यातील काही बचतगटांनी या माध्यमातून आर्थिक उलाढाल करीत महिलांना रोजगार मिळवून देण्यात यशही मिळविले आहे. मात्र त्यानंतरही बचतगट उभारणीच्या या प्रयोगात अनेक अडचणीचे अडथळे उभे आहेत. बचतगटांच्या स्थापनेनंतर बँकांकडूनच या गटाची अडवणूक केली जात असल्याच्या महिलांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. बचतगटांचे खाते काढण्यासाठी बँकेत गेलेल्या पदाधिकाºयांना पॅनकार्डची सक्ती केली जात आहे. ५० हजारांपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार असेल तरच पॅनकार्ड आवश्यक असल्याचा नियम सांगतो. मात्र त्यानंतरही पॅनकार्ड मागितले जात असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. बँकेत खाते काढताना अध्यक्ष आणि सचिव यांनी उपस्थित राहणे आवश्यक असताना गटाच्या सर्वच महिलांना उपस्थित राहण्यास सांगितले जात असल्याच्या तक्रारीही बचतगटांच्या महिलांनी केल्या आहेत.बँक खात्यासाठी अनेक महिने प्रतीक्षाअनेक महिला बचतगटांनी बँक खात्यासाठी कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र त्यानंतरही खाते क्रमांक न मिळाल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील मिल्लतनगर भागात महिलांनी एकत्रित येऊन मंजू बचतगटाची स्थापना मार्च २०१७ मध्ये केली आहे. या गटाला अद्यापही बँकेकडून खाते क्रमांक मिळाला नाही. खाते क्रमांकासाठी बँकेत चार-पाच वेळा जावून आले. मात्र आज देतो, उद्या देतो एवढेच उत्तर बँकेकडून मिळत असल्याचे मनीषा श्रीराम यांनी सांगितले. तर नवीन कौठा येथील लक्ष्मी बचतगटाची अडचण वेगळीच आहे. वजिराबाद येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत खाते काढण्यासाठी त्यांनी रितसर अर्ज दिला आहे. मात्र जोपर्यंत बचत भरत नाहीत तोपर्यंत खाते क्रमांक मिळणार नाही, असे त्यांनी बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. क्रांतीनगर येथील त्रिशला आणि वजिराबाद येथील बुद्ध पहाट या बचतगटांना बँकांकडून अशीच कारणे सांगितली जात आहेत. शहरातील जवळपास तीस ते पस्तीस बचतगटांना अशा विविध कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून खाते क्रमांक मिळालेला नाही.कापडी बॅग पुरवठ्याचा बचतगटांना प्रस्तावनांदेड शहरात प्रशासनाच्या वतीने कॅरिबॅग बंदी लागू करण्यात आली असून येत्या १ एप्रिलपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कॅरिबॅग बंदी लागू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने महिला बचतगटांनी कापडी बॅग उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला आहे.४या प्रकल्पामध्ये लहान, मध्यम तसेच मोठ्या आकाराच्या बॅगा तयार करता येऊ शकतात. याद्वारे साडेतीनशेहून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध होईल.४तसेच दररोज सुमारे पन्नास हजारांहून अधिक कापडी बॅगचा पुरवठा या बचतगटांच्या माध्यमातून केला जाईल,असे महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रस्तावात नमूद केले आहे.
महिला बचतगटांची बँकांकडून कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 11:40 PM
महिला बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाची चळवळ जिल्ह्यात मूळ धरत आहे. मात्र या महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्या उभारणीमध्ये अडथळ्यांचे डोंगर उभे केले जात असल्याने महिलांच्या विकासाच्या या चळवळीत अडथळे निर्माण होत आहेत. बचत खाते काढून देण्याबाबतही जिल्ह्यातील बँकांकडून सहकार्य केले जात नसल्याच्या बचतगट महिलांच्या तक्रारी आहेत.
ठळक मुद्देपॅनकार्ड सक्तीचे : खाते क्रमांकासाठी माराव्या लागतात चकरा