लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले तसेच स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे शहरात उभारले जाणार आहेत. यात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर फुले दाम्पत्याच्या पुतळ्याचेही काम लवकरच सुरू होणार आहे.शहरातील गणेशनगर भागातील विस्तारित यशवंतनगर परिसरातील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी शाळेची एक एकर जागा महापालिकेने १ कोटी ५ लाख रुपये मोबदला देत ताब्यात घेतली. या जागेवर शाहू महाराजांचा १२ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसविला जाणार आहे. या पुतळ्याच्या जागेच्या सुशोभिकरणाचे काम पूर्णत्वास जात आहे. तर १२ फूट उंचीचा ब्रांझ धातूच्या पुतळ्यासाठी मुंबईच्या सावंत आर्ट स्टुडिओकडे हे काम सोपविले आहे. यासाठी ३१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या पुतळ्यासाठी आवश्यक त्या सर्व विभागाच्या परवानगी २०१७ मध्ये प्राप्त झाली आहे. कला संचालनालय मुंबई आणि राज्याच्या मुख्य वास्तू शास्त्रज्ञांची परवानगीही प्राप्त आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात शहरात सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभा राहणार आहे.शहरातील महात्मा फुले चौक येथे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारले जाणार आहे. प्रत्येकी ९ फूट उंचीच्या या पुतळ्यासाठी ४० लाख रुपये खर्च केला जाणार आहे. जागेच्या विवादामुळे महात्मा फुले पुतळ्याचे काम प्रलंबित होते. आता आयटीआयची जागा पुतळ्यासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. लवकरच सुशोभिकरणाच्या कामास प्रारंभ होणार आहे. आॅगस्टअखेर फुले दाम्पत्याचा पूर्णाकृती पुतळा शहरात दिमाखाने उभा राहणार आहे.या पुतळ्यामुळे शहरात सामाजिक समतेचा संदेश जाणार असून या पुतळ्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी राज्यमंत्री आ. डी.पी. सावंत, महापालिकेचे सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले आदींनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश आले आहे.दरम्यान, नवीन नांदेडातील नवीन कौठा येथे महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात येणार आहे. १२ फूट उंच असलेल्या या पुतळ्यासाठी ३९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या पुतळ्याच्या कामाचे आदेशही मुंबईच्याच सावंत आर्ट स्टुडिओकडे देण्यात आले आहे.पुतळ्यासाठी आवश्यक आठ आर जमीन महापालिकेने महसूल विभागाकडून नुकतीच प्राप्त केली आहे. या पुतळ्यासाठीच्या आवश्यक त्या परवानगीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सभागृहनेते गाडीवाले यांनी दिली.