नांदेड जिल्हा परिषदमध्ये आठरा विभागप्रमुखांपैकी नऊ अधिकारी पूर्णवेळ आहेत. मागील महिन्यात अनेक अधिकारी सेवानिवृत्त झाले, तर महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील शिंगणे यांची अमरावती येथे पदोन्नतीने बदली झाली आहे.
प्रमुख पदेच रिक्त, निर्णय प्रक्रियेला लागतोय ब्रेक
आजघडीला ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पद हे दीड वर्षापासून रिक्त आहे. अद्याप शासनाने हे पद भरलेले नाही. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसुद्धा आठ महिन्यांपासून रिक्त आहे. मागच्या महिन्याच्या शेवटी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगोले हे सेवानिवृत्त झाले आहेत. माध्यमिक विभागालासुद्धा शिक्षणाधिकारी मिळालेले नाहीत. जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हे पद रिक्त आहे. दक्षिण बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता हे पद रिक्त आहे. समाजकल्याण तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अशी नऊ पदे रिक्त असून, या पदाचा पदभार प्रभारी अधिकारी मार्फत चालविला जात आहे. तसेच उमरी, कंधार, हिमायतनगर, मुदखेड व नांदेड येथील गट विकास अधिकारी यांचे पद रिक्त असल्याने अतिरिक्त पदभार देऊन कामकाज करून घेतले जात आहे.
जिल्हा परिषदेमध्ये उपलब्ध कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून कामे करून घेण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक अधिकारी आपले कर्तव्य चोखपणे बजावत असल्याने प्रशासन गतिमान होण्यास निश्चितच मदत होते. दरम्यान, शाळा सुरू झाल्या असून, जिल्ह्यातील १२ गटशिक्षणाधिकारी हे प्रभारी असल्याने शिक्षण विभागातील निर्णय प्रक्रियेमध्ये तालुकास्तरापासून वैयक्तिक माझ्यासह शिक्षणाधिकाऱ्यांनाही अधिक लक्ष घालावे लागते. - वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नांदेड.